हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संकल्प आणि प्रार्थना करूया ! – प्रमोद मुतालिक, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रीराम सेना

‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’साठी प्रमोद मुतालिक यांचा संदेश !

प्रमोद मुतालिक

‘रामनाथी येथे हिंदु राष्ट्र अधिवेशन चालू आहे. मला गोव्यात येण्यावर तेथील भाजपच्या राज्य सरकारने निर्बंध लावले आहेत. त्यामुळे गेल्या ६ वर्षांपासून मला या अधिवेशनामध्ये उपस्थित रहाता आले नाही. याविषयीचा खटला अद्यापही सर्वाेच्च न्यायालयात चालू आहे. या अधिवेशनामध्ये सहभागी झालेले सर्व प्रमुख आणि अनुभवी हिंदु प्रतिनिधी यांना माझा नमस्कार ! भारत देश हिंदु राष्ट्र होता आणि पुढेही रहाणार आहे. प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या काळात हे हिंदु राष्ट्र होते. त्याकाळी सर्वत्र समानता, न्याय आणि दंड असा पद्धतीचे हिंदूंचे अत्यंत आदर्श राज्य होते. सध्या देशात हिंदू बहुसंख्य असले, तरी हा देश हिंदु राष्ट्र नाही. भारतीय  राज्यघटनेत जेव्हा ‘भारत हे हिंदु राष्ट्र आहे’, असे घोषित होईल, तेव्हा हा देश हिंदु राष्ट्र होईल.

आता हिंदु समाज जागृत झाला आहे. आता ज्ञानवापी मशीद नसून ते हिंदूंचे मंदिर असल्याचे उघड झाले आहे. काश्मीरमधील ३७० कलम रहित करण्यात आले आहे. काश्मीरमधून ज्या लक्षावधी हिंदूंनी पलायन केले होते, त्यांचे मूळ ठिकाणी पुनर्वसन करायचे आहे. त्यांच्या सुरक्षेचे दायित्व केंद्र आणि राज्य सरकार यांना पार पाडायचे आहे. याखेरिज जी सहस्रो मंदिरे तोडून तेथे मशिदी बांधल्या गेल्या, त्यांनाही परत घ्यायचे आहे आणि हे आपले कर्तव्य आहे. अशाच प्रकारे सर्व हिदूंनी संघटित होऊन ‘हिंदु राष्ट्र’ घोषित होण्यासाठी आंदोलन करायचे आहे. हिंदु राष्ट्रामुळे देशात शांती, एकता आणि समानता नांदेल. हा देश रामराज्याप्रमाणे हिंदु राष्ट्र बनेल. हे स्वप्न आपल्या सर्वांना मिळून साकार करायचे आहे. यासाठी परिश्रम करूया, लढूया आणि वैध मार्गाने आंदोलन करूया ! असा संकल्प आणि प्रतिज्ञा आपल्याला घ्यायची आहे.