गांधीवाद्यांची हिंसा !

काँग्रेसवाल्यांनी देशभर जो तमाशा चालवला आहे, तो संतापजनक !

‘नॅशनल हेराल्ड’ नियतकालिकातील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून (‘ईडी’कडून) चौकशी चालू आहे. हे चौकशीसत्र सध्या देशभर चर्चेचा विषय झाला आहे. हे प्रकरण वर्ष २०१२ मधील आहे. या प्रकरणातील संशयितांची १० वर्षांनंतर चौकशी होणे, हे आपल्याकडे अजिबात नवीन नाही. राहुल यांच्या चौकशीचे निमित्त करून सध्या काँग्रेसवाल्यांनी देशभर जो तमाशा चालवला आहे, तो संतापजनक आहे. या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसवाल्यांनी रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन आरंभले आहे. त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयाबाहेरही निदर्शने केली. जोरदार घोषणाबाजी करून टायर पेटवून ते रस्त्यावर फेकले. काँग्रेसचे देहली प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी आणि काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या यांनी पोलिसांशी झटापट केली. आंदोलन करणारे काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला, पी. चिदंबरम्, हरिष रावत आदींना पोलिसांनी कह्यात घेतले. या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाल्याने कलम १४४ लागू करण्यात आले. खरे तर या गैरव्यवहारात काँग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांनाही चौकशीला बोलावले आहे; परंतु त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. त्यामुळे आज ना उद्या त्यांचीही चौकशी होणारच आहे आणि तेव्हाही असाच किंबहुना याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात तमाशा होणार आहे, हे उघड आहे. त्यामुळे पोलिसांनी आताच अशांचा बंदोबस्त केला पाहिजे.

ढोंगी लोकशाहीवाद !

वास्तविक काँग्रेसच्या नेत्यांकडून काँग्रेस हा लोकशाहीवादी पक्ष असल्याचे वारंवार सांगितले जाते. याचा अर्थ लोकशाहीच्या मार्गाने जे जे होईल, त्या-त्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा आहे, हे सरळ आहे. तथापि काँग्रेसचे खायचे आणि दाखवायचे दात नेहमीच वेगळे असतात. ‘नॅशनल हेराल्ड’मधील गैरव्यवहाराच्या प्रकरणी सोनिया आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध चालू असलेली कारवाई लोकशाहीनेच निश्चित केलेल्या कायदेशीर मार्गाने होत आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला, तो कायदेशीर होता. त्यांना चौकशीसाठी पाठवलेले समन्सही कायदेशीर होते. मग या चौकशीला निमूटपणे सामोरे जाण्यात अडचण काय आहे ? हा तमाशा करून सार्वजनिक संपत्तीची हानी करायची आणि सर्वसामान्य जनतेला वेठीस धरायचे, ते कशासाठी ? उलट गांधी हे शांतपणे स्वतःहून चौकशीला सामोरे गेले असते, तर कदाचित् त्यांचे स्वागत झाले असते. त्याद्वारे त्यांना स्वतःचे निर्दाेषत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली असती; पण त्यांनी ती गमावली. हे आंदोलन म्हणजे व्यक्तीकेंद्रित राजकीय पक्षाचे, तसेच नेत्याने स्वार्थासाठी संपूर्ण पक्ष दावणीला बांधल्याचे उदाहरण आहे.

काँग्रेसचा दुटप्पीपणा !

ज्या घोटाळ्यावरून हा तमाशा चालला आहे, त्या ‘नॅशनल हेराल्ड’ घोटाळ्याची व्याप्ती मोठी आणि गुंतागुंतीची आहे. भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी वर्ष २०१२ मध्ये हा घोटाळा सर्वप्रथम उघडकीस आणला.

काँग्रेसचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘नॅशनल हेराल्ड’ नावाचे वृत्तपत्र चालू केले होते. या वृत्तपत्राचे प्रकाशक ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ नावाचे आस्थापन होते. वर्ष २००८ मध्ये वृत्तपत्रावर ९० कोटी रुपयांचे कर्ज झाल्याने ते बंद करण्यात आले. पुढे वर्ष २०१० मध्ये ‘यंग इंडिया लिमिटेड’ नावाचे आस्थापन स्थापन करण्यात आले. त्यामध्ये गांधी माता-पुत्रांचे ७६ टक्के समभाग (शेअर्स) होते, तर उर्वरित २४ टक्के समभाग हे काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडे होते. ‘यंग इंडिया लिमिटेड’ने केवळ ५० लाख रुपयांत ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ विकत घेतले. डिसेंबर २०१० मध्ये सोनिया आणि राहुल गांधी यांनी ९० ते ९५ कोटी रुपयांचे कर्ज कायदेशीररित्या दोघांच्या नावावर करून घेतले आणि ‘असोसिएटेड जर्नल्स लि.’ला त्यांच्या कर्जाचे देणेकरी असल्याचे दाखवले. यावर आरोप झाल्यानंतर काँग्रेसने ‘यंग इंडिया लिमिटेड’चा उद्देश नफा कमावणे नसून ती समाजकार्यासाठी (?) स्थापन करण्यात आली असल्याचे लंगडे स्पष्टीकरण दिले. हा घोटाळा एवढ्यावरच थांबला नाही, तर एका षड्यंत्राद्वारे काँग्रेसच्या कोषातून अनुमाने २ सहस्र कोटी रुपये मूल्य असणारी लक्ष्मणपुरी (लखनऊ), देहली आणि मुंबई येथील अचल संपत्ती हडप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हा संपूर्ण घोटाळा उघड झाल्यापासून जेव्हा जेव्हा हा विषय आला, तेव्हा तेव्हा काँग्रेसवाल्यांनी आक्रस्ताळेपणा केला आहे. प्रसंगी संसदेचे कामकाजही बंद पाडले आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती केली जात आहे. असे असले, तरी या सर्व घोटाळ्याची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईलच; पण या निमित्ताने काँग्रेसची ‘चोर तो चोर वर शिरजोर’ ही वृत्ती दिसून आली.

कुठल्या प्रकरणात हिंदूंनी असे आंदोलन केले असते, तर त्यांना काँग्रेसने लोकशाहीचे डोस पाजले असते, तसेच ‘हिंदूंमुळे लोकशाही धोक्यात आली आहे’, अशी ओरड केली असती; पण आज जेव्हा काँग्रेसवर वेळ आली आहे, तेव्हा हेच डोस काँग्रेसवाल्यांनी सोयीस्करपणे बाजूला ठेवून हिंसक मार्ग अवलंबला आहे. आता त्यांना लोकशाही धोक्यात असल्याचे अजिबात वाटत नाही, उलट या हिंसक कृत्याला ते ‘न्यायाची लढाई’ म्हणत आहेत. यापेक्षा मोठा दुटप्पीपणा दुसरा कुठला असू शकतो ? स्वातंत्र्यपूर्वकाळात मोहनदास गांधी यांनी इंग्रजांविरुद्ध सत्याग्रह करून देश हालवून सोडला होता, आज त्याच गांधींचे समर्थक असलेले कुटुंबीय आणि पक्ष यांचे अनुयायी भ्रष्टाचाराचे निलाजरे समर्थन करण्यासाठी देशाला वेठीस धरत आहेत. ही काँग्रेसची झपाट्याने विनाशाकडे होणारी वाटचाल नाही, तर काय आहे ? जोपर्यंत सत्ता असते, तोपर्यंत स्वतःच्या भ्रष्टाचारावर सहज पांघरूण घालता येते; पण सत्ता ही कुणाच्याही दारी कायमस्वरूपी थांबत नसते आणि सत्य फार काळ लपवून ठेवता येत नाही, याचा विसर काँग्रेसवाल्यांना पडला आणि आज त्याचीच प्रचीती काँग्रेस घेत आहे !

स्वार्थासाठी हिंसक आंदोलन करणाऱ्या काँग्रेसमुळे लोकशाही धोक्यात आली आहे !