Coimbatore Girl Student Controversy : ८ वीच्या विद्यार्थिनीला मासिक पाळी आल्याने मुख्याध्यापकांनी वर्गाबाहेर बसवले !

कोईम्बतूर (तमिळनाडू) येथील एका गावातील शाळेतील घटना

कोइम्बतूर (तमिळनाडू) – कोइम्बतूरच्या किनथुकाडावू तालुक्यातील सेनगुट्टैपलयम गावातील स्वामी चिदभवंद मॅट्रिक उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणार्‍या एका १४ वर्षांच्या विद्यार्थिनीला मासिक पाळी येत असल्याने मुख्याध्यापकांनी तिला वर्गाबाहेर बसवण्यास सांगितले. विद्यार्थिनीने ५ विषयांची परीक्षा वर्गाबाहेर बसून दिली. या प्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने शाळेत जाऊन जाब विचारला होता. तसेच स्थानिकांनी पोल्लाचीच्या उपजिल्हाधिकार्‍यांकडे जाऊन तक्रार नोंदवण्याची आणि शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

१. कोइम्बतूरचे जिल्हाधिकारी पवनकुमार जी. गिरियाप्पनवर म्हणाले की, ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचे अन्वेषण चालू केले आहे. चौकशीच्या आधारे कारवाई केली जाणार आहे. सध्या समोर आलेली तथ्ये आणि माहितीच्या आधारे कारवाई केली जाईल.

२. नोव्हेंबर २०२४ मध्ये केंद्र सरकारने मासिक पाळी स्वच्छता धोरणाला मान्यता दिली. हे धोरण आणण्याचा उद्देश म्हणजे मासिक पाळीच्या वेळी मुलींना शाळेत येण्यापासून रोखणारे अडथळे दूर करण्याचा आहे; मात्र अशा घटना त्याला छेद देत आहेत.

शाळांमध्ये शौचलयांच्या अभावामुळे विद्यार्थिनींकडून शाळेत जाणे टाळले जाते !

भारतातील शालेय विद्यार्थिनींच्या स्थितीवरील एका सर्वेक्षणात असे आढळून आले की, शौचालयाच्या कमतरतेमुळे एक चतुर्थांश विद्यार्थिनी त्यांच्या मासिक पाळीच्या काळात शाळेत जात नव्हत्या.

संपादकीय भूमिका

हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचे अशा प्रकारच्या घटना घडत आहेत. यामुळे अशा घटनांचा अपलाभ पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी आणि तथाकथित अंधश्रद्धा निर्मूलनवाले घेतात, हे लक्षात घ्या !