तनिषा भिसे मृत्यू प्रकरणातील डॉ. केळकरांच्या वक्तव्यावर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा आक्षेप !
पुणे – आम्ही कधीही अर्जावर अनामत रक्कम (डिपॉझिट), असे लिहित नाही. मी माझ्या एवढ्या वर्षांच्या काळात कधीच असे केले नव्हते; पण त्या दिवशी राहू-केतू डोक्यात काय आले आणि या लोकांनी ‘डिपॉझिट’ लिहून दिले काय माहीत नाही, अशी प्रतिक्रिया तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात ‘दीनानाथ रुग्णालया’चे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावरून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे विशाल विमल यांनी केळकरांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. ‘असा अशास्त्रीय दावा केल्यासंबंधी डॉ. धनंजय केळकर, डॉ. सुश्रुत घैसास यांची उपचार, निदान करण्यासंबंधीची मान्यता राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने रहित करावी’, अशी मागणी त्यांनी केली आहे. (आकाशात सूर्याभोवती भ्रमण करणारे ग्रह मानवी जीवनावर परिणाम करतात, हे भारतीय ऋषिमुनींनी प्राचीन काळी ओळखले होते. नवग्रहांचा मानवी जीवनावर होणारा परिणाम आता शास्त्रज्ञांनीही मान्य केला आहे. मिशेल गौकालीन या संशोधकाने वर्ष १९५५ या वर्षी मंगळाच्या मानवी जीवनावरील प्रभावाचा अभ्यास केला होता. पाश्चात्त्य विद्यापिठे ज्योतिषशास्त्राच्या संशोधनास प्रोत्साहन आणि मान्यता देतात. त्यामुळेच राहू-केतू मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, असे म्हणणार्या अंनिसची बौद्धीक कीव करावी तेवढी थोडीच ! अंनिसनेच समाजाची दिशाभूल करणे थांबवावे ! – संपादक)
विशाल कमल पुढे म्हणाले की, कोणताही शास्त्रीय आणि व्यावहारिक आधार नसलेल्या ज्योतिषात राहू, केतू हे २ ग्रह मानले आहेत; मात्र खगोलशास्त्रामध्ये राहू, केतूला ग्रह म्हणून मान्यता नाही आणि खरेतर कोणतेही ग्रह हे पृथ्वीवरील मनुष्यावर काहीही परिणाम करत नाहीत, हे शास्त्रीय पद्धतीने स्पष्ट झालेले आहे. (शास्त्रज्ञांनी पौर्णिमा आणि अमावास्येच्या वेळी नैसर्गिक आपत्ती वाढल्याचे निरीक्षण नोंदवले आहे, ज्यामुळे ग्रहांमुळे होणार्या परिणामाची शक्यता व्यक्त केली जाते. ‘मानवावर चंद्राचाच काय अन्य ग्रहांचाही परिणाम होतो, हे विज्ञानानेही मान्य केले आहे’, हे अंनिसला ठाऊक नसणे म्हणजे त्यांचे अज्ञान ! – संपादक)