जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गड कोटाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा !

खंडोबा गडावर विकासकामे करण्यासाठी शासनाचे साहाय्य होणार !

जेजुरीचे खंडोबा मंदिर

जेजुरी (जिल्हा पुणे) – महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गड कोटाला पुरातत्व खात्याने राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाचा दर्जा घोषित केला आहे. याविषयीचे पत्र श्री मार्तंड देवस्थानला पाठवण्यात आले आहे. राज्य सरकारने तीर्थक्षेत्र विकास आराखडा संमत केला असून यासाठी ३४९ कोटी रुपयांची संमती दिली आहे. त्यांपैकी अनुमाने १०९ कोटी रुपयांची विकासकामे पहिल्या टप्प्यात चालू आहेत. जेजुरीचे खंडोबा मंदिर आणि गडकोट हे राज्य संरक्षित स्मारक यापूर्वीच घोषित करण्यात आले असून याविषयीचे पत्र पुणे पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे यांनी दिले आहे. त्यामुळे आता खंडोबा गडावर विकासकामे करण्यासाठी शासनाचे अधिक साहाय्य होणार असल्याचे विश्वस्त मंडळाकडून सांगण्यात आले.

विश्वस्त मंडळाने ही माहिती पालखी सोहळा खांदेकरी, मानकरी, नित्य सेवेकरी, पुजारी सेवेकरी आणि ग्रामस्थ यांना दिली. या वेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजित देवकाते, विश्वस्त अधिवक्ता पांडुरंग थोरवे, विश्वास पानसे, माजी विश्वस्त नितीन राऊत, सचिन मोरे, भाग्येश बारभाई आदी उपस्थित होते.