सप्तशृंगी गडावर ऐन चैत्रोत्सवात पाणीटंचाईमुळे भाविक त्रस्त !

सप्तशृंगी देवी

नाशिक, १० एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रातील श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगी गडावर सध्या चालू असलेल्या चैत्र यात्रेत लाखो भाविकांची गर्दी होत आहे; मात्र गडावर पाण्याच्या टंचाईमुळे भाविकांची असुविधा होत आहे. ३ दिवसांपासून यात्रा चालू असली, तरी पाण्याचा एकही टँकर गडावर आलेला नाही. जिल्हाधिकार्‍यांच्या बैठकीत गडावर टँकर पुरवण्याचे आदेश देण्यात आले होते; पण प्रत्यक्षात कार्यवाही झालेली नाही. (जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणार्‍या संबंधितांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक) 

  • पाणी विकत घ्यावे लागते, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. ग्रामपंचायतीकडून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. – भूषण देशमुख, ग्रामस्थ, सप्तश्रृंगीगड
  • भाविकांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे; पण गेल्या १५ दिवसांपासून नळातून पाणीच येत नाही.

१. भाविकांना स्वतः बाटलीचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. गडावरील ग्रामपंचायतीकडून कुठल्याही प्रकारचे नियोजन न झाल्यामुळे भाविकांना उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे.

२. परिसरात १०८ प्राचीन कुंड असूनही त्यांचे पुनर्जीवन करण्यात आलेले नाही.

३. गावाजवळील भवानी तलावातून गडाला पाणीपुरवठा व्हावा; म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी व्यय करण्यात आला; पण पाणी गळतीमुळे त्याचाही उपयोग होत नाही.

४. वर्ष १९९८ मध्ये उभारण्यात आलेले जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद असून ते झोपडपट्टीसारखे दिसत आहे.

५. जिल्हाधिकार्‍यांनी मान्य केलेली ७५ लाख रुपयांची योजनाही अर्धवटच पडून आहे.

६. ‘देवी संस्थान’च्या वतीने केवळ मंदिर परिसरातील काही भागांत पाण्याची व्यवस्था केली जात आहे.

७. भाविकांच्या नावे निधी मिळत असला, तरी त्याचा वापर करण्यात येत नसल्याचे समजते.

८. यात्रा नियोजनासाठीच्या बैठकीला १५ दिवस झाले, तसेच यात्रा चालू होऊनही ३ दिवस उलटले; पण अद्याप पाण्याचे नियोजन झालेले नाही.

– प्रकाश कडवे, जिल्हा चिटणीस, भाजप