चांदर (गोवा) येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराच्या दगडांची विक्री झाल्याचा इतिहासतज्ञांचा दावा

हिंदूंचा वारसा नष्ट केला जात असल्याची व्यक्ती केली भीती !

चांदर येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराचे नूतनीकरण

पणजी, १३ जून (वार्ता.) – चांदर येथील कदंबकालीन श्री महादेव मंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम चालू आहे. या ऐतिहासिक वारशाचे नूतनीकरण नव्हे, तर संवर्धन होणे अपेक्षित आहे. मंदिराच्या दगडांची विक्री झालेली असू शकते. यामुळे हिंदूंचा ऐतिहासिक वारसा नष्ट करण्याचे काम चालू असल्याचा आरोप इतिहासतज्ञ प्रा. प्रजल सारखदांडे यांनी केला आहे. मंदिर नूतनीकरणाच्या कामाची छायाचित्रे सामाजिक माध्यमात फिरत असल्याचा दावा इतिहासतज्ञ योगेश नागवेकर यांनी केला आहे.

कदंबकालीन श्री महादेव मंदिर महंमद तुघलक आणि पोर्तुगीज यांनी जतनेवर केलेल्या छळाची साक्ष देते

कुशावती नदीच्या काठावरील चांदर येथील श्री महादेव मंदिर हे ११ व्या शतकातील कदंब राजवटीतील आहे. त्या काळी चांदर या गावाला चंद्रपूर असे संबोधले जायचे आणि चंद्रपूर ही त्याकाळी गोव्याची राजधानी होती. वर्ष १९३० मध्ये मंदिराचे सापडलेले अवशेष हे महंमद तुघलक आणि पोर्तुगीज यांनी येथील जनतेचा केलेला छळ अन् मंदिराची केलेली तोडफोड यांची साक्ष देत आहे. नंदीची मोडलेली मूर्ती आहे. या ठिकाणी गर्भगृह आणि नंदीचा बाजूचा भाग आहे. यापूर्वी तांबडी सुर्ल येथील ऐतिहासिक आणि पुरातन श्री महादेव मंदिराला सिंमेट लावण्याचे काम इतिहासतज्ञांनी रोखले होते. इतिहासतज्ञ प्रा. प्रजल सारखदांडे म्हणाले, ‘‘राज्य सरकार आक्रमकांनी तोडलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करणार असल्याचे म्हणत आहे; मात्र एका बाजूने पुरातत्व खात्याकडून ऐतिहासिक चिन्हे मिटवण्याचा प्रयत्न होत आहे. मंदिराचे नूतनीकरण केल्यास मंदिराची पुरातन चिन्हे रहाणार नाही. या प्रकरणी देहली येथील पुरातत्व खात्याला पत्र पाठवण्यात आले आहे.’’

दगडांच्या विक्रीविषयी खुलासा करावा

इतिहासतज्ञ प्रा. प्रजल सारखदांडे पुढे म्हणाले, ‘‘फादर हेन्नी यांनी वर्ष १९३० मध्ये चांदर येथे केलेल्या खोदकामाच्या वेळी पुरातन काळातील विटांसारखे बांधकाम आढळले. त्या ठिकाणी नाणेही सापडले. येथील दगडांचे बांधकाम संरक्षित न करता नवे बांधकाम करण्यात आले आहे. नूतनीकरणाच्या नावावर ऐतिहासिक दगडांची विक्री झालेली असू शकते. राज्यात याविषयी संताप व्यक्त केला जात आहे.’’ (याची चौकशी करून पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक)

संपादकीय भूमिका

हे त्या ठिकाणी पूर्वी मंदिर असल्याचे सर्व पुरावे नष्ट करण्याचे षड्यंत्र असू शकते !