नवी देहली – ज्या नात्यात सहमतीने प्रेमसंबंध ठेवण्यात आले असतील, तसेच शारीरिक संबंध प्रस्थापित झाले असतील आणि असे नाते तुटले; म्हणून पुरुषावर बलात्कार किंवा लैंगिक शोषणाचा गुन्हा नोंदवता येणार नाही. अशा प्रकरणांना कुठल्याही प्रकारचा गुन्ह्याचा रंग देता येणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला.
१. तक्रारकर्त्या महिलेने वर्ष २०१९ मध्ये आरोप केला होता की, तिच्या प्रियकराने विवाहाचे वचन देऊन तिच्यावर बलात्कार केला, तसेच तिचे लैंगिक शोषण केले. त्याने बलपूर्वक शरीरसंबंध ठेवले. ‘लैंगिक संबंध ठेवले नाहीस, तर तुझ्या कुटुंबाला मी दुखापत करीन’, अशी धमकी त्याने दिली होती.’ यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला होता. यानंतर आरोपी पुरुषाने गुन्हा रहित व्हावा, यासाठी अर्ज प्रविष्ट (दाखल) केला होता. देहली उच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यावर न्यायालयाने ही मागणी फेटाळली. त्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.
२. सर्वोच्च न्यायालयाने ‘महिलेने केलेले आरोप तथ्यहीन आहेत’, असे सांगत तिला विचारले की, ‘जर पुरुष बलात्कार करत होता, लैंगिक शोषण करत होता तरीही तू त्याला का भेटत होतीस ?’ दोघेही सज्ञान असल्याने त्यांच्यात सहमतीने शरीर संबंध प्रस्थापित झाले. विवाहाचे वचन देऊन हे सगळे चालू झाले, याचा कुठलाही संकेत आढळत नाही. त्यामुळे या प्रकरणात लैंगिक शोषण किंवा बलात्कारचा गुन्हा नोंदवता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले.