‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्र आहे कि कचरा टाकण्याचे मैदान ! – स्वाती शिंदे, नगरसेविका

‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्राच्या परिसरात टाकलेल्या कचर्‍याची पहाणी करतांना नगरसेविका सौ. स्वाती शिंदे

सांगली, ११ जून (वार्ता.) – ‘हिराबाग वॉटर वर्क्स’ परिसरातून गावठाण भागात पाणीपुरवठा केला जातो. याच भागात महापालिकेने कचर्‍याचे मैदान केले असून प्रभाग क्रमांक १५, १६ आणि १७ मधील कचरा येथे टाकला जातो. यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी निर्माण होऊन परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या भागाला प्रभाग क्रमांक १६ च्या नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांनी भेट देऊन ‘हिराबाग वॉटर वर्क्स’ पाणीपुरवठा केंद्र आहे कि कचरा टाकण्याचे मैदान ?’, असा प्रश्न उपस्थित केला, तसेच येथे कचरा टाकणे बंद न केल्यास हा कचरा महापालिकेच्या मुख्यालयात आणून टाकू अशी चेतावणीही दिली आहे. या वेळी आदित्य पटवर्धन, गजानन मोरे, आशिष साळुंखे, ओंकार पवार उपस्थित होते.