सांगली जिल्ह्यातील सागरेश्वर अभयारण्याची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा ! – दत्तात्रय भरणे, वन राज्यमंत्री

मंत्रालयात आयोजित बैठकीत बोलतांना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, तसेच अन्य अधिकारी

मुंबई – सांगली जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्याला मजबूत कुंपण उभारणे, जल मृदसंधारण करणे, गवत कुरण विकास करणे, वन वणवा नियंत्रण ही कामे प्राधान्याने करून या क्षेत्रातील वन समस्यांविषयी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करून तात्काळ मार्गी लावावीत, असे आदेश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सांगली जिल्ह्यातील पलूस आणि कडेगाव वन विभागाच्या क्षेत्रातील समस्यासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला कुंडल (जिल्हा सांगली) येथील आमदार अरुण लाड, अपर प्रधान मुख्यवनसरंक्षक बेंझ यांसह अन्य उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार अरुण लाड म्हणाले, ‘‘सागरेश्वर अभयारण्य विकसित करण्याविषयी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत, तसेच या भागातील अवैध वृक्षतोड थांबवून सागरेश्वर अभयारण्यामध्ये हरणांकरता चारा उपलब्ध करावा. सागरेश्वर अभयारण्य विकसित करतांना स्थानिक ग्रामस्थांना विचारात घेऊन वन विभागाने कामे करावीत.’