आज ५ जून २०२२ या दिवशी पू. गोळवलकरगुरुजी यांचे पुण्यस्मरण आहे. त्या निमित्ताने…
पू. माधव सदाशिव गोळवलकरगुरुजी यांचा जन्म १९ फेव्रुवारी १९०६ या दिवशी नागपूर येथे झाला. त्यांचे वडील शासकीय विद्यालयात काम करत. सदाशिव बाळकृष्ण गोळवलकर हे गुरुजींचे वडील नागपुरात ‘भाऊजी’ म्हणून परिचित होते. त्यांच्या आईंना सर्व जण ‘ताई’ म्हणत. सेवानिवृत्तीनंतर भाऊजी रामटेकला राहिले. वर्ष १९२२ मध्ये चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमधून गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. इंटरपर्यंतचे शिक्षण नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये घेऊन डॉक्टर होण्याच्या सिद्धतेने ते लक्ष्मणपुरीला (उत्तरप्रदेश) गेले. तेथे त्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला नाही. मग ते वाराणसीकडे गेले. ते बनारस हिंदू विद्यापिठातून वर्ष १९२६ मध्ये बी.एस्सी. आणि १९२८ मध्ये एम्.एस्सी. झाले. प्राणीशास्त्राचे ते विद्यार्थी होते. यानंतर सतत संशोधन करावे, या हेतूने ते मद्रासला गेले; पण मद्रासचे हवामान त्यांच्या प्रकृतीला मानवले नाही. ते परत घरी आले. वर्ष १९३३ मध्ये बनारस विद्यापीठाने त्यांना प्राणीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून पाचारण केले. ही नियुक्ती ३ वर्षांसाठी होती.
सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार यांची पू. गुरुजींशी झालेली पहिली भेट आणि स्वामी अखंडानंद यांनी केलेले भाकित
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भेटीसाठी रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक डॉ. केशव हेडगेवार बनारसला येत. त्यांनी पू. गुरुजींना पाहिले, अभ्यासले आणि अक्षरशः आत्मसात् केले. गोळवलकरगुरुजी स्वामी विवेकानंद यांचे भक्त असल्याने त्यांना ‘रा.स्व. संघ कार्याच्या धुरेला जुंपावे’, असे डॉ. हेडगेवार यांना वाटू लागले. वर्ष १९३७ च्या मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर पू. गुरुजींना स्वामी अखंडानंद यांनी अनुग्रह दिला. स्वामी अखंडानंद स्वतः भगवान रामकृष्ण परमहंस यांचे अनुग्रहित होते. या दीक्षाविधीनंतर थोड्याच दिवसांत स्वामी अखंडानंद समाधीस्थ झाले. स्वामींनी जाण्यापूर्वी एक भविष्य वर्तवले होते, ‘अरे गोळवलकर, तुझा जन्म विवेकानंदासारखा राष्ट्रकारणासाठी आहे. तू येथे फार काळ राहू शकणार नाहीस. ‘राष्ट्रदेवो भव’ हा मंत्र जपत तू देशभर फिरशील.’ गुरुजी आपल्या आध्यात्मिक गुरूंच्या निर्वाणानंतर अस्वस्थ झाले. त्यांनी आश्रम सोडला. ते पुन्हा नागपूर गेले.
डॉ. हेडगेवार यांनी संघकार्याची धुरा पू. गोळवलकरगुरुजींकडे सोपवणे आणि त्यांनी अनुभवलेले चढउतार
अशा अवस्थेत डॉ. हेडगेवार यांनी त्यांना जवळ केले. डॉक्टरांना विद्वान, विरक्त आणि राष्ट्रनिष्ठ असा उत्तराधिकारी भेटला. येथून पुढचा गुरुजींचा प्रवास वेगाने घडला. वर्ष १९३९ चा गुरुपूजन समारंभ झाला आणि डॉक्टरांनी आपल्या कार्याची धुरा पू. गुरुजींच्या खांद्यावर ठेवली. अप्पाजी जोशी यांना अगोदरच हे सूचित करण्यात आले होते. २१ फेब्रुवारी १९४० या दिवशी डॉ. हेडगेवार यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतरची ३३ वर्षे पू. गोळवलकरगुरुजींनी संघाचे सारथ्य केले. या प्रदीर्घ कालावधीत संघाने अनेक चढउतार पाहिले. संघबंदीचा आदेश निघाला. पू. गुरुजींना कारावास भोगावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून पू. गोळवलकरगुरुजींपर्यंत अनेक जणांना संशयित आणि देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न झाला; पण हा वनवास संपला.
पू. गोळवलकरगुरुजींची हिंदु राष्ट्राची संकल्पना आणि त्यांचा देहत्याग
पू. गोळवलकरगुरुजी सांगत, ‘‘हिंदुत्वाच्या गगनाखाली असणारे राष्ट्र ते हिंदु राष्ट्र !’’ आपल्या ३३ वर्षांच्या खडतर जीवनाने पू. गुरुजी थकत गेले. वर्ष १९६९ ते १९७३ या काळात ते सतत आजारी होते. वर्ष १९७० मध्ये डॉक्टरांनी निदान केले की, पू. गुरुजींना कॅन्सर (कर्करोग) झाला आहे. हे ऐकून अनेक जण व्याकुळ झाले, खचून गेले. पू. गुरुजी शांतपणे म्हणाले, ‘‘देह विनाशी आहे. राष्ट्र कार्य अविनाशी आहे.’’ ५ जून १९७३ या दिवशी पू. गुरुजींनी देहत्याग केला. डॉ. हेडगेवार यांच्या समाधीस्थानासमोर त्यांना मंत्राग्नी देण्यात आला.
– स्व. प्रा. शिवाजीराव भोसले
(साभार : सामाजिक संकेतस्थळ)