केंद्र सरकार उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना खोट्या गुन्ह्यात लवकरच अटक करणार ! – देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

डावीकडून उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

नवी देहली – देहलीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना लवकरच अटक होणार असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली आहे. केंद्राने सर्व यंत्रणांना त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवण्याचा आदेश दिला आहे, असा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला. आर्थिक अपहाराच्या प्रकरणी देहलीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालयाने ३० मे या दिवशी अटक केली होती. त्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी हा आरोप केला आहे.

केजरीवाल यांनी व्हिडिओ संदेशामध्ये म्हटले आहे, ‘‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘आम्हा सर्वांनाच कारागृहामध्ये टाका’, अशी विनंती करतो. आमची चौकशी करा, तसेच आमच्यावर धाड टाका. त्यानंतर मग आम्ही आमचे काम करू शकतो; कारण आम्हाला राजकारण समजत नाही, आम्हाला केवळ काम करायचे समजते.’’