..तर पाकचे ३ तुकडे होणार ! – पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा दावा

भारत बलुचिस्तानला वेगळे करण्यासाठी प्रयत्नात असल्याचाही आरोप

पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानी सैन्याने सध्याच्या परिस्थितीत हस्तक्षेप केला नाही, तर देशाचे ३ तुकडे होऊ शकतात. देश आत्महत्येच्या स्थितीत पोचला आहे, असा दावा पाकचे माजी पंतप्रधान इम्रान यांनी ‘बोल न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. ‘परदेशातील भारतीय ‘थिंक टँक’ (विशिष्ट समस्यांचे निराकरण करण्यासाठी नियुक्त केलेले तज्ञांचे मंडळ) बलुचिस्तानला वेगळे करण्याचा विचार करत आहे. त्याच्याजवळ एक आराखडा आहे’, असा आरोपही इम्रान खान यांनी या वेळी केला.

इम्रान खान यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले की, खरी समस्या पाकिस्तान देश आणि पाकिस्तानी सैन्य यांची आहे. सैन्याने योग्य निर्णय घेतला नाही, तर सर्वप्रथम सैन्य  उद्ध्वस्त होईल. एकदा देश उद्ध्वस्त झाला की, सगळे दिवाळखोरीत निघेल. त्यानंतर जग पाकिस्तानला अण्वस्त्रांचा त्याग करायला सांगेल. युक्रेनवर वर्ष १९९० च्या दशकात ही वेळ आली होती.