परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव पहातांना आलेल्या अनुभूती

वैशाख कृष्ण सप्तमी (२२.५.२०२२) या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेला रथोत्सव मंत्रघोषात चालू झाला. तेव्हा रामनाथी आश्रमातील एकूणच वातावरण भावविभोर झाले होते. रथयात्रा जसजशी हळूहळू पुढे सरकू लागली, तसे ‘श्रीराम शाळिग्राम’ असलेल्या पालखीच्या मागून येणाऱ्या सुवर्ण रंगाच्या एका रथाने सर्वांचे लक्ष वेधले. त्या रथात परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूच्या वेशभूषेत विराजमान झाले होते आणि त्यांच्या उजव्या बाजूला त्यांच्या एक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ अन् डाव्या बाजूला दुसऱ्या उत्तराधिकारी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ बसलेल्या होत्या. हे दृश्य पहाताच माझे नेत्र विस्फारले गेले.

१. प्रीतीमय परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे विलोभनीय रूप पाहून ‘आनंद आणि भक्ती’, असा संमिश्र भाव मनात दाटून येणे

श्रीमती मेघना वाघमारे

श्वेतवर्णी सप्त अश्व जोडलेला सुवर्ण रंगाचा आणि पाना-फुलांनी शोभिवंत केलेला रथ अन् रथात श्रीमन्नारायणाच्या रूपात साधकांना आश्वस्त करणाऱ्या प्रीतीमय सुहास्यवदनाने विराजमान झालेले परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) ! त्यांच्याकडून सर्वत्र चैतन्याचे प्रक्षेपण होत होते. ध्यानी-मनी नसलेले परात्पर श्री गुरूंचे हे रथारूढ रूप पाहून ‘आनंद आणि भक्ती’, असा संमिश्र भाव माझ्या मनात दाटून आला. काही क्षण मला स्वतःला हरवल्यासारखे वाटले.

२. ‘रथारूढ झालेल्या श्रीविष्णूच्या रूपातील श्री गुरूंचा हा ऐतिहासिक रथोत्सव पहाण्यासाठी साधकांच्या समवेत सूक्ष्मातून सहस्रो पुण्यात्मे, ३३ कोटी देवता आणि चराचर सृष्टीतील अनंत कोटी जीव यांनी गर्दी केली आहे’, असे मला जाणवले.

३. कलियुगातील आताच्या काळाला अनुसरून सुशोभित करण्यात आलेला तो रथ सूक्ष्मातून अत्यंत दैदिप्यमान भासत होता.

४. ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, ही परात्पर गुरु डॉक्टरांची परम इच्छाच हा रथ चालवत आहे’, असे जाणवणे

आश्रमाच्या उतारमार्गावरून रथ पुढे सरकू लागला. तेव्हा मला वाटले, ‘कालपथाच्या अतूट अशा उतरणीवरून हा दैदिप्यमान रथ सत्ययुगाकडे वेगाने वाटचाल करत आहे. ‘जणू कालमाहात्म्य आणि कालचक्र यांना अनुसरून हिंदु धर्माला लागलेले ग्रहण सुटावे’, यासाठी हा रथ सत्ययुगाकडे वेगाने वाटचाल करत आहे. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या मार्गातील अनंत अडथळे दूर करत हा रथ निघाला असून ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, ही परात्पर श्री गुरूंची परम इच्छाच हा रथ चालवत आहे.’

– श्रीमती मेघना वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.५.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक