नाशिक येथे भ्रष्ट वाहकाला कारागृहाची शिक्षा, तर फुकट प्रवास करणार्‍यांची माहिती सामाजिक माध्यमांत उघड करणार !

तोटावाढीमुळे आयुक्तांचा निर्णय !

नाशिक – येथील महापालिकेच्या सिटी लिंक बससेवेचा तोटा दिवसागणिक वाढत आहे. प्रवाशांकडून अल्प पैसे घेऊन वाहक तिकीट न देणार्‍या वाहकांसाठी आयुक्त रमेश पवार यांनी कठोर धोरण अवलंबले आहे. यापुढे दंडासमवेतच आर्थिक अफरातफरीचा ठपका ठेवत संबंधितांना कारागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे, तसेच फुकट्या प्रवाशांचे छायाचित्र घेऊन बुडवलेल्या तिकिटाच्या रकमेची माहितीही सामाजिक माध्यम आणि वर्तमानपत्रे यांतून प्रसिद्ध केली जाणार आहे. २४ मे या दिवशी येथे संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

१. ‘सिटी लिंक’च्या १९६ बसगाड्या असूनत्यासाठी ५९२ वाहकांची नेमणूक करण्यात आली आहे. यावर लक्ष ठेवण्यासाठी ३५ पडताळणी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून त्यांच्यावर मासिक ७ लाख याप्रमाणे वर्षभरात ८४ लाख रुपये व्यय होत आहे; मात्र तरीही तिकीट बुडवण्याचे प्रमाण वाढले आहे. २५ रुपये तिकीट असेल, तर १५ किंवा २० रुपये प्रवाशांकडून घेऊन संबंधितास तिकीट न देता विनामूल्य प्रवास करून दिला जात होता.

२. तिकीट तपासनीस नेमल्यावर हे समोर आले. जुलै २०२१ ते एप्रिल २०२२ पर्यंत ७२ सहस्र १३३ फेर्‍या पडताळण्यात आल्या. त्यात ८७१ फुकटे प्रवासी सापडले. त्यांच्याकडून ३ लाख ५ सहस्र, तर उत्तरदायी १५१ वाहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. यात प्रवाशांकडून तिकिटांचे पैसे घेणे; मात्र तिकीट न देणे, प्रवाशांकडून तिकिटांचे पैसे घेणे; परंतु अल्प किमतीचे तिकीट देणे किंवा विनातिकीट प्रवास करू देण्याची मुभा देणे अशा प्रकारच्या त्रुटी होत्या.

संपादकीय भूमिका

  • तोट्यास उत्तरदायी असणारे बसचालक, वाहक, ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांच्यावर बडतर्फीची कठोर कारवाई करून त्यांच्याकडून सर्व हानीभरपाई वसूल केली पाहिजे !
  • यापूर्वीच आयुक्तांनी अशा उपाययोजना काढल्या असत्या, तर ‘सिटी लिंक’ बससेवा लाभात आली असती.