महिलांनो, भक्ती वाढवा !

सतत महिलांवर होणारे अत्याचार, त्यांच्यासमवेत होणारी छेडछाड, अशा अनेक समस्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न होत आहेत. मग त्यासाठी अनेक आंदोलने, महामोर्चे, लेख-अग्रलेख, विविध ‘हॅशटॅग’, व्हिडिओ, विज्ञापने अशा नाना प्रकारच्या माध्यमांचा अवलंब झाला. निश्चितच याचे पडसादही समाजात उमटले; मात्र सुरक्षिततेचा प्रश्न काही सुटलेला नाही. एवढ्या मोहिमा राबवूनही आज स्त्री पूर्णपणे सुरक्षित नाही. वर्ष २०२१ मध्ये अंबाजोगाई (जिल्हा बीड) बसस्थानकावर रहाणाऱ्या अल्पवयीन मुलीवर ४०० जणांनी बलात्कार केल्याचे समोर आले होते. नुकतेच बीडमध्ये महिलेची छेड काढतांनाचा व्हिडिओ सिद्ध केल्याच्या प्रकरणी पीडित महिलेचे कुटुंबीय जाब विचारण्यास गेले असता त्यांच्यावरच जमावाने आक्रमण केले. यानंतर एका ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली.

४०० जणांच्या बलात्काराने पीडित अल्पवयीन मुलीने बालकल्याण समितीला दिलेल्या जबाबात खुलासा केला आहे की, ४०० हून अधिक लोकांनी माझ्यावर बलात्कार केल्याची तक्रार घेऊन मी अंबाजोगाई पोलीस ठाणे येथे गेलो असता तक्रार प्रविष्ट करवून घेतली नाही. उलट एका पोलिसानेही तिच्यावर बलात्कार केला. हे ऐकून कुणालाही संताप आल्यावाचून रहाणार नाही. असे पोलीस असतील तर कधीतरी महिलांवरील अत्याचार थांबतील का ? महिला संरक्षणासाठी अनेक कायदे करण्यात आले आहेत; पण प्रभावी कार्यवाही नाही, तसेच ४० टक्क्यांहून अधिक खटल्यांत आरोपींना शिक्षाच होत नाही. यामध्ये पालट व्हावा, यासाठी वर्ष १९९२ मध्ये महिला आयोगाची स्थापना करण्यात आली, तरीही महिलांची सुरक्षा अजूनच गंभीर आणि चिंताजनक आहे. हे भीषण वास्तव छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात सामान्यांना चीड आणणारे आणि सर्वपक्षीय शासनकर्त्यांसाठी लज्जास्पद आहे.

द्रौपदीची कृष्णभक्ती

महिलांनो, सर्व स्थिती पहाता महाभारतातील द्रौपदीचा प्रसंग आठवून श्रीकृष्णाची भक्ती वाढवल्याविना पर्याय नाही. धर्मांध, वासनांध आणि रज-तमाने भरलेल्या जगात केवळ श्रीकृष्णच संरक्षण करू शकतो. कोणत्याही वेळी, कुठेही आणि कधीही तोच साहाय्यासाठी कुणालाही पाठवू शकतो. त्यामुळे क्रियमाण म्हणून स्वरक्षणासाठी कराटे, लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेऊन भक्ती वाढवूया.

– वर्षा कुलकर्णी, सोलापूर