धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॉन्व्हेंट शाळां’वर कारवाई करा ! – किशोर घाटगे, शिवसेना

कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करतांना हिंदुत्वनिष्ठ

कोल्हापूर, २३ मे (वार्ता.) – देशभरातील अनेक ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये जाणीवपूर्वक हिंदु विद्यार्थ्यांना लक्ष्य करून त्यांना शिक्षा देण्याचे प्रकार होतात. हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती केली जाते. या शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येत असल्याने त्या राज्यशासनास जुमानत नाहीत. या शाळा मुजोर झाल्या असून अशा प्रकारे धर्मांतराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘कॉन्व्हेंट शाळां’वर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे यांनी केली. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाच्या लक्षात येत नाही का ? – संपादक) ते २३ मे या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे आयोजित ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलना’त बोलत होते. ‘कर्नाटकात ‘कॉन्व्हेंट शाळे’मध्ये बायबल शिकवण्याचा जो प्रकार झाला, असा प्रकार आम्ही महाराष्ट्रात होऊ देणार नाही’, अशी चेतावणीही त्यांनी या प्रसंगी दिली. या प्रसंगी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे अध्यक्ष श्री. सुनील सामंत, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, सनातन संस्थेच्या सौ. प्रीती पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी ‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’चे श्री. मंदार खांबेटे, धर्मप्रेमी श्री. अक्षय पाटील आणि श्री. संभाजी थोरवत, शिरोली येथील श्री. संदीप चौगुले यांसह हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून चौकशी करू ! – महेश चोथे, शिक्षण उपसंचालक, कोल्हापूर

शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

आंदोलन झाल्यावर हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक श्री. महेश चोथे यांना निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यावर शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून घेऊ आणि चौकशी करू, असे आश्वासन दिले.