अवघे आयुष्य संतूरवादनाच्या साधनेला समर्पित करून त्यातून ईश्वराची अनुभूती घेणारे पद्मविभूषण (कै.) पं. शिवकुमार शर्मा (वय ८४ वर्षे) !

‘संतूर’चे मंजुळ सूर कानावर पडताच डोळ्यासमोर उंच आणि तेजःपुंज, अशी पंडित शिवकुमार शर्मा यांची व्यक्तीरेखा साकार होते. संतूर या वाद्यात परिपूर्णता आणून त्याला जनमानसात प्रचलित करणारे पं. शिवकुमार शर्मा हे एकमेव कलाकार होते. या वाद्याला ‘शततंत्री वीणा’, असेही म्हटले जाते. पंडितजींनी त्यांचे अवघे आयुष्य संतूरवादनाच्या साधनेलाच वाहिले आणि त्यांचे वडील उमा दत्त शर्मा (गायक) यांच्या इच्छेनुसार त्यांनी ‘सर्वाेत्तम संतूरवादक’ म्हणून प्रसिद्धी मिळवली.

१०.५.२०२२ या दिवशी पं. शिवकुमार शर्मा (वय ८४ वर्षे) यांचे निधन झाले. ‘पं. शिवकुमार शर्मा यांचा बालपणापासूनचा संतूरवादन साधनेचा प्रवास, त्यांनी घेतलेले परिश्रम, तसेच त्यांनी संगीत साधनेविषयी व्यक्त केलेले मौलिक विचार’, या लेखात देत आहोत. या लेखाच्या माध्यमातून आम्ही पं. शिवकुमार शर्मा यांना महर्षि अध्यात्म विश्यविद्यालयाकडून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो.

पं. शिवकुमार शर्मा

१. बालपणापासून प्रथम शास्त्रीय गायन आणि तबलावादन यांचे शिक्षण घेणे अन् कालांतराने वडिलांच्या इच्छेनुसार संतूरवादन शिकणे

पं. शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले, ‘‘मी वयाच्या ५ व्या वर्षापासून शास्त्रीय गायन आणि तबलावादन यांचे धडे गिरवायला आरंभ केला. माझे वडील उमा दत्त शर्मा (गायक) यांनी सखोल अभ्यास करून ठरवले, ‘मी संतूरवर भारतीय शास्त्रीय संगीत वाजवणारा भारतातील पहिला वादक बनावे.’’

एकदा शिवकुमार यांच्या वडिलांनी त्यांच्या हातात संतूर हे वाद्य देऊन त्याद्वारे त्यांना संगीत साधना करायला सांगितली. आरंभी काही वर्षे गायन केल्यानंतर वडिलांच्या इच्छेनुसार पं. शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून संतूरवादन शिकण्यास आरंभ केला. त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच संगीताचे शिक्षण मिळाले. अशा प्रकारे वडिलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याकडून संगीताचे शिक्षण मिळाल्याने पं. शिवकुमार यांची ‘संतूरवादन साधना’ चालू झाली.

वडिलांचे स्वप्न पं. शिवकुमार यांनी प्रत्यक्षात उतरवले. संतूर या वाद्याला लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जाते.

२. संतूर हे वाद्य परिपूर्ण करण्यासाठी केलेले चिंतन आणि त्या वाद्यात केलेल्या सुधारणा

पं. शिवकुमार शर्मा सांगायचे, ‘‘प्रत्येक वाद्याची स्वतःची एक भाषा असते. ‘संतूर’ या वाद्याविषयी चिंतन करतांना मी ‘दुसऱ्या वाद्याची नक्कल किंवा आवाजाचा परिणाम (‘इफेक्ट’) या वाद्यात होता कामा नये’, असा विचार केला.’’ ‘या वाद्याची स्वतःची ओळख बनवीन’, असेही त्यांनी ठरवले होते. पं. शिवकुमार शर्मा यांनी ‘संतूर’ या वाद्याच्या नादात गोडवा आणि मधुरता आणणे, तीनही सप्तकांत (टीप १) वादन करता येणे, त्यावर बाराही स्वर (टीप २) वाजवता येणे, ‘स्ट्रायकर’च्या (टीप ३) साहाय्याने आलाप वाजवायची विशेष पद्धत’ इत्यादी सुधारणा घडवून आणल्या.

टीप १ – ७ शुद्ध, ४ कोमल आणि १ तीव्र, अशा १२ स्वरांचा समूह, म्हणजे सप्तक. सप्तके ३ प्रकारची असतात.

अ. मंद्र सप्तक : याचा आवाज जाडा असतो.

आ. मध्य सप्तक : याचा आवाज मध्यम असतो. (सामान्यतः आपण याच सप्तकात बोलतो आणि गातो.)

इ. तार सप्तक : याचा आवाज बारीक असतो.

टीप २ – ७ शुद्ध, ४ कोमल आणि १ तीव्र स्वर

टीप ३ – विशेष प्रकारच्या काड्यांनी तारांवर आघात करून स्वरनिर्मिती केली जाते, त्या काड्यांना ‘स्ट्रायकर’ असे म्हणतात. ‘स्ट्रायकर’ साधारणपणे अक्रोडच्या झाडांपासून बनवले जातात.

३. पं. शिवकुमार शर्मा यांना संतूरवादन करतांना आलेली अनुभूती

पंडित शिवकुमार शर्मा यांनी सांगितले, ‘‘वादन चालू करून मी थोडासा स्थिर झाल्यानंतर माझे डोळे उघडे असले, तरीही मी शून्यावस्थेत असतो. मी संगीताशी एकरूप होऊन समर्पित होतो. तेव्हा ‘परमेश्वरी शक्तीच माझ्या माध्यमातून वादन करते’, असे मला जाणवते.

४. पं. शिवकुमार शर्मा यांनी नवीन कलाकारांना केलेले आवाहन !

नवीन कलाकारांनो, तुमचा स्वतःवर पूर्ण विश्वास असू द्या ! तुम्ही आयुष्यभर विद्यार्थ्याच्या भूमिकेत रहा !’

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर, संगीत समन्वयक (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सौ. अनघा जोशी (बी.ए. संगीत, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१२.५.२०२२)

पंडित शिवकुमार शर्मा यांचे संगीत साधनेविषयीचे मौलिक विचार

सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर
सौ. अनघा जोशी

१. अंतर्मुख झाल्याविना स्वर अनुभवता येत नाहीत ! : संगीत ही अशी कला आहे की, आपल्याला समोर गाणारा कलाकार दिसतो; पण त्याने गायलेले स्वर आपण बघू शकत नाही. जसा भगवंत दिसू शकत नाही; पण त्याचा अनुभव घेता येतो; गुलाबाचे फूल बघू शकतो; पण त्याचा सुगंध दिसत नाही, तद्वतच या गोष्टींचा अनुभव घ्यावा लागतो; म्हणूनच अंतर्मुख झाल्याविना स्वर अनुभवता येत नाहीत.

२. आरंभी कलाकारांनी एकांतात कलेची साधना करणे आणि टप्प्याटप्प्याने कला राजदरबारी पोचून ‘प्रसिद्धी आणि राजमान्यता मिळावी’, यासाठी तिचा उपयोग होऊ लागणे : अंतर्मुखता लवकर साधण्यासाठी साधू आणि संत एकांतात जाऊन साधना करायचे. त्याप्रमाणे आरंभीच्या कालखंडात कलाकार एकांतात कलेची साधना करायचे. नंतरच्या काळात संगीत देवळात पोचले. तेव्हा भजन आणि कीर्तन यांद्वारे अनेक जणांसमोर कलेचे सादरीकरण होऊ लागले. त्यानंतर ती कला राजदरबारी पोचली. ‘राजाकडून स्तुती होऊन प्रसिद्धी आणि राजमान्यता मिळावी’, यासाठी तिचा उपयोग होऊ लागला.

३. भारतीय शास्त्रीय संगीत हे अध्यात्माचेच दुसरे रूप असल्याने त्यातून अंतर्मुख होऊन आनंद घ्यायला शिका ! : रसिकांनी संगीत ऐकतांना कोणत्याही व्यक्तीने, मग तो कलाकार असो किंवा रसिक असो, त्यातील तांत्रिक गोष्टींवर खल करण्यापेक्षा त्यातील आनंद अनुभवावा. भारतीय शास्त्रीय संगीत हे अध्यात्माचेच दुसरे रूप आहे. त्यामुळे अशा संगीतातून अंतर्मुख व्हायला आणि त्यातील आनंद घ्यायला शिका !

४. प्रत्येक कलाकाराला स्वतःच्या कलेतील उणिवा आणि बलस्थाने ठाऊक असायला हवीत.

५. स्वर आणि लय, राग आणि ताल, हे समतोल असले पाहिजेत. वेगवेगळी लय वापरून भावना पालटता येतात, उदा. लय संथ असल्यास त्यातून शांत आणि स्थिर भावना निर्माण होते अन् लय वाढवली की, चंचलतेची भावना निर्माण होते.

६. रागातून परिणाम साधण्यासाठी वर्षानुवर्षे साधना करावी लागते.

– सुश्री (कु.) तेजल पात्रीकर आणि सौ. अनघा जोशी (१२.५.२०२२)

५. पं. शिवकुमार शर्मा यांची संतूरवादनाची वाटचाल : पं. शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या वादनकौशल्याचे पहिले सादरीकरण वर्ष १९५५ मध्ये मुंबई येथे हरिदास संगीत संमेलनात केले. वर्ष १९५६ मध्ये त्यांनी व्ही. शांताराम यांच्या ‘झनक झनक पायल बाजे…’ या गाण्याला संगीत दिले. वर्ष १९६० मध्ये त्यांनी स्वतःचा एकल गीतसंच प्रसिद्ध केला.

वर्ष १९६७ मध्ये त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिजभूषण काब्रा यांच्या समवेत ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली. ती कालांतराने पुष्कळ प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांच्या साथीने त्यांनी काही चित्रपटांना संगीत दिले. त्याचा आरंभ वर्ष १९८० मध्ये ‘सिलसिला’ या हिंदी चित्रपटापासून झाला. या काळात या जोडीने ‘शिव-हरि’ या नावाने चित्रपटांना संगीत दिले.

६. पं. शिवकुमार शर्मा यांना मिळालेले विविध पुरस्कार : पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान अन् पुरस्कार मिळाले होते. वर्ष १९८५ मध्ये त्यांना ‘बाल्टिमोर’ शहराचे मानद नागरिकत्व मिळाले. त्यांना वर्ष १९८६ मध्ये ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार मिळाला. वर्ष १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’, तसेच वर्ष २००१ मध्ये ‘पद्मविभूषण’ या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

पं. शिवकुमार शर्मा यांनी ‘जर्नी विथ अ हंड्रेड स्ट्रिंग्ज : माय लाईफ इन म्युझिक’ हे आत्मचरित्र लिहिले आहे.