ज्ञानवापी, ज्ञानेश्वर, नंदिकेश्वर आणि दत्त संप्रदाय यांचा एकमेकांशी असलेला संबंध

सध्या चालू असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणाविषयी . . .

काशी विश्वनाथ मंदिर

काशी क्षेत्राचा उल्लेख राजा हरिश्चंद्राच्या काळात आणि त्यापूर्वी मार्कंडेय पुराणातही आढळणे

आपल्या पिढीला ज्ञात असलेला काशीचा संदर्भ म्हणजे राजा हरिश्चंद्राने मणिकर्णिका घाटावर स्मशानात डोंब म्हणून चाकरी करणे. त्यांचा उल्लेख अनेक पुराणात आहे, ज्यात ऐत्रेय ब्राह्मण, महाभारत, देवी भागवत आणि मार्कंडेय पुराणात आहे. मार्कंडेय हे चिरंजीवी महर्षि आहेत. नर्मदा परिक्रमेचे जनक आणि दक्षिण भारतातील बहुतांश कुळांचे गोत्र मार्कंडेय आहेत. जर मार्कंडेय एवढे पुरातन आहेत, तर त्यांनी त्यांच्यावर लिहिले ते हरिश्चंद्र आणि जेथे हरिश्चंद्रांने चाकरी केली, ते काशी क्षेत्र किती आद्य अन् पुरातन असेल, याचा विचार करता येईल.

श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्यांचे नातेवाईक आणि भक्त यांना काशीत निवास करण्यास सांगणे

भगवान दत्तात्रेयांचा अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पिठापूर सोडल्यावर ते वायू मार्गाने आणि मनोवेगाने काशीत प्रकटले. श्रीपाद यांनी पिठापूर सोडतांना आजोबा बापन्नाचार्य, वडील अप्पलराज शर्मा, नरसिंह वर्मा, वेंकटपय्या श्रेष्ठी यांना सहकुटुंब काशीतच निवास करण्यास सांगितले. त्यामुळे काशीत, तसेच उत्तर भारतात शर्मा, वर्मा, श्रेष्ठ ही आडनावे आहेत.

श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पंचक्रोश काशीयात्रेमधील शास्त्रोक्त दर्शनाचा क्रम सांगणे

श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी संन्यास घेण्यासाठी काशीला गेले. महाराज गाणगापुरात असतांना पूर्वी गोदावरी काठावर वासर ब्रह्मेश्वर येथे स्वामींचे दर्शन, माधुकरी सेवा मिळालेले साखरे सायंदेव २५ वर्षांनी गाणगापुरात आले. येथे संगमावर सायंदेव यांनी कायमस्वरूपी सेवा मागताच स्वामींनी त्यांची परीक्षा घेतली आणि त्यात ते परीक्षेत उत्तीर्ण झाले. ४१-४२ व्या अध्यायात काशीयात्रा वर्णन सविस्तर आहे. अवतरणिका सांगते की,

एकेचाळिसीं सायंदेवा । हस्तें घेती श्रीगुरुसेवा ।
ईश्वरपार्वतीसंवाद बरवा ।
काशीयात्रानिरुपण ॥
– गुरुचरित्र, अध्याय ५३, ओवी ५९

या पंचक्रोश काशीयात्रा निरुपणामध्ये काशीतील एकूण एक अधिकृत मंदिरांचा उल्लेख असून आधी कुठे स्नान करायचे ? मग कोणत्या क्रमाने कोणत्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे ? कोणत्या तीर्थावर जाऊन पुन्हा स्नान करायचे ? परत कोणत्या क्रमाने दर्शन चालू करायचे ? हा सविस्तर शास्त्रोक्त दर्शन क्रम श्रीगुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी सायंदेव यांना समजून सांगितला.

पंचक्रोश यात्रेत ज्ञानवापी स्नान, ज्ञानेश्वर (शिवलिंग) आणि नंदिकेश्वर यांचे दर्शन घेण्याविषयी सांगण्यात येणे

ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याचा आदेश महाविष्णूंनी दिला ते स्थान म्हणजे काशी ज्याचा उल्लेख महास्थान म्हणून पुराणात आहे. विधीवत् काशी पंचक्रोश यात्रेत पहिली येते अंतर्गृह यात्रा. जिच्यात ज्ञानवापीत स्नान करून ज्ञानेश्वर शिवलिंगाचे दर्शन घेऊन नंतर नंदिकेश्वर दर्शन घ्यायचे आहे. नंतर दक्षिण मानसयात्रेत पुन्हा ज्ञानवापी स्नान आणि ज्ञानेश्वर दर्शन सांगितले आहे. नंतर चालू होते उत्तर मानसयात्रा. यातही ज्ञानवापी स्नान आणि ज्ञानेश्वर दर्शन सांगितले आहे. नंतर पुन्हा ज्ञानेश्वर दर्शन घ्यायला सांगितले आहे. नंतरच्या नित्य यात्रेत पुन्हा ज्ञानवापी स्नान आणि नंदिकेश्वर दर्शन घ्यायचे आहे.

ज्ञानवापीं करी स्नान । नंदिकेश्वर अर्चाेन ।।
तारकेश्वर पूजोन । पुढें जावें मग तुवां ।।
– गुरुचरित्र, अध्याय ४२, ओवी ५७

नंतर चौथ्यांदा ज्ञानवापी स्नान करून शृंगारसौभाग्यगौरी दर्शन सांगितले आहे. अशा प्रकारे ५ वेळा ज्ञानवापीमध्ये स्नान सांगितले आहे आणि येथील नंदी समोर जे शिवलिंग आहे, त्याचे नाव आहे ज्ञानेश्वर ! अशा प्रकारे गुरुचरित्रात ज्ञानवापी, ज्ञानेश्वर आणि नंदिकेश्वर असाच उल्लेख त्यात आढळतो.

– हिराचंद गोपालचंद कोठारे

(साभार : सामाजिक माध्यम)