पुणे येथे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमामधील मारहाण प्रकरणात भाजपच्या ३ कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद !

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी  आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यां

पुणे – शिवानंद द्विवेदी लिखित ‘अमित शहा आणि भाजपची वाटचाल’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या प्रमुख पाहुण्या म्हणून १६ मे या दिवशी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात आल्या होत्या. कार्यक्रमाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणा देण्यास चालू केल्याने सभागृहामध्ये गोंधळ झाला. यामध्येच राष्ट्रवादीच्या नेत्या वैशाली नागवडे यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. या प्रकरणामध्ये तक्रारही प्रविष्ट करण्यात आली होती. याच तक्रारीची नोंद घेत डेक्कन पोलिसांनी भाजपच्या ३ कार्यकर्त्यांच्या विरोधात मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या वैशाली नागवडे यांच्यासह ५ महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे. इराणी यांचा ताफा परत जात असतांना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला होता.

या घटनेविषयी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची चूक असेल, तर त्यांच्यावर गुन्हे नोंद होतील, तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांची चूक असेल, तर त्यांच्यावरही गुन्हे नोंद होतील. भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांना मारहाण करणे, ही अतिशय आक्षेपार्ह गोष्ट आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध जी कारवाई करायची असेल ती होईलच.