पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांचा विरोधकांना प्रश्‍न

कुंडई, १५ मे (वार्ता.) – पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांची पुनर्उभारणी केल्यास त्यात चुकीचे काय आहे ? यामध्ये विघातक किंवा समाजात फूट पाडण्याचा प्रश्‍न येतोच कुठे ? असा प्रश्‍न तपोभूमी कुंडई येथील श्री दत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर पद्मश्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी उपस्थित केला. कुंडई येथील तपोभूमीचे संस्थापक राष्ट्रसंत सद्गुरु ब्रह्मानंदाचार्य स्वामीजी यांचा पुण्यतिथी महोत्सव आणि गुरुमंत्र जपानुष्ठान कार्यक्रमप्रसंगी सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराज बोलत होते.

राज्यशासनाने पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे. याला काही जणांकडून विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी यांनी वरील प्रश्‍न विरोधकांना केेले. या वेळी व्यासपिठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर, समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, विधानसभेचे सभापती रमेश तवडकर आदी उपस्थित होते. प्रारंभी श्री धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी महाराज यांच्या हस्ते गोव्यातील लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात आला.

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी पुढे म्हणाले,

१. हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. उलट हिंदूच त्रासलेले आहेत. आज हिंदूंवरच आघात होत आहेत. हिंदूंचे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी करत असल्यामुळे हिंदूंनाच दोषी ठरवले जात आहे.’’

२. नेत्यांनी हिंदु म्हणून काम केले पाहिजे. हिंदु म्हणून पुढाकार घेतला पाहिजे. स्वत:ला ‘हिंदु आमदार’ म्हणवून घ्यायला त्यांना अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने आत्मपरीक्षण केले पाहिजे. ‘मी मुख्यमंत्री, खासदार किंवा आमदार या नात्याने हिंदु धर्मासाठी काय केले ?’ याचे चिंतन करून सूची सिद्ध करावी. यामध्ये न्यून पडलो असल्यास धर्माच्या कार्यात भर घालावी आणि चांगले कार्य केले असेल, तर ‘जेथे धर्म, तेथे विजय निश्‍चित’, हे ध्यानात ठेवावे. धर्म नसलेले किंवा धर्मासाठी काम न केलेले लोकप्रतिनिधी बिनकामाचे आहेत. कितीही प्रतिष्ठा मिळवली, तरी धर्माचे पाठबळ नसल्यास विनाश अटळ आहे; म्हणून धर्माला सोडून कसलेच काम करू नये. मंत्री, आमदार यांनी सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. जो स्वत:ला भारतीय मानतो, त्या प्रत्येकाला साहाय्य केले पाहिजे.’’

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी विदेशात धर्माचा प्रचार करतात, हे गोमंतकियांसाठी अभिमानास्पद ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्याची ओळख ही केवळ ‘सूर्य, वाळू आणि किनारा’ यापुरतीच मर्यादित राहू नये. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक पर्यटन यांसाठीही लोकांनी गोव्यात यायला हवे.

देव, धर्म आणि देश यांचा प्रचार गुरुपरंपरेनुसार वेगवेगळ्या पिठांकडून चालू आहे. सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी विदेशात जाऊन धर्माचा प्रचार करत आहेत, हे गोमंतकियांसाठी अभिमानास्पद आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यक्रमात म्हटले.

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी ब्रिटीश संसदेत पारंपरिक भगव्या वेशात जाणार !

सद्गुरु ब्रह्मेशानंद स्वामी हे ‘मुस्लिम वर्ल्ड लीग’च्या वतीने सौदी अरब येथील रियाध येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हिंदूंचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. या अनुषंगाने ते म्हणाले, ‘‘आज कट्टरपंथीयसुद्धा सर्वांना समवेत घेऊन जाण्याची भाषा करत आहेत. संयुक्त अरब अमिरातमध्ये नुकतीच झालेली जागतिक परिषद त्याच अनुषंगाने होती. इतरांसमवेत पुढे जातांना ‘हिंदु’ म्हणून आपण स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवले पाहिजे आणि हिंदु धर्म कधीही सोडू नये. ब्रिटीश संसदेत मला वेगळ्या वेषात यायला सांगितले आहे; परंतु मी त्यांना ‘मी माझ्या पारंपरिक भगव्या वेशातच येणार’, असे ठासून सांगितले आहे.’’