हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आल्यासच धर्माचे रक्षण होईल ! – कालीचरण महाराज

कालीचरण महाराज

ठाणे, १३ मे (वार्ता.) – आज हिंदू हे भाषावाद, प्रांतवाद, वर्णवाद आणि जातीवाद यांत अडकले आहेत. हे वाद सोडून आपण हिंदुत्वाच्या झेंड्याखाली एकत्र आलो, तरच धर्माचे रक्षण होईल. जोपर्यंत हे वाद आपण नष्ट करत नाही, तोपर्यंत हिंदुत्वाचे भले होणार नाही, असे उद्गार कालीचरण महाराज यांनी ठाणे येथे पत्रकारांशी बोलतांना काढले. ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट पहाण्यासाठी येथे आले होते.

कालीचरण महाराज पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांनी केवळ मराठ्यांचे साम्राज्य निर्माण केले नाही, तर सर्व जातींच्या लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ‘हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावे’, ही श्रींची इच्छा होती. आपण छत्रपती शिवरायांच्या मार्गावर चाललो असल्याने निःसंशयपणे संपूर्ण भारतातील हिंदू एकत्र येतील.’’

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्यायला हवा !

‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी केलेल्या कार्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासमोर आदर्श ठेवला आहे. श्रीमद्भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण आदर्श धारण केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्याचे ध्येय आणि श्री जगदंबेची भक्ती आपल्या हृदयात जागृत झाली पाहिजे’, असे विधान कालीचरण महाराज यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलतांना केले.