श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मथुरेतील न्यायालयांना निर्देश

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिले आहेत. भगवान श्रीकृष्ण विराजमानाचे न्यायमित्र मनीष यादव यांच्या याचिकेवर ही सुनावणी करण्यात आली. या याचिकेद्वारे या प्रकरणी असणार्‍या सर्व याचिका एकत्र करून त्यांवर एकत्र सुनावणी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने वरील निर्देश दिले.

मुसलमान पक्षकार अनुपस्थित रहात नसेल, तर थेट निर्णय देऊ !  

या सुनावणीच्या वेळी न्यायालयात सुन्नी वक्फ बोर्ड आणि अन्य पक्षकार उपस्थित नव्हते. त्यावर न्यायालयाने म्हटले, ‘जर मुसलमान पक्ष उपस्थित रहाणार नसेल, तर आम्ही थेट निर्णय देऊ.’ मथुरेच्या जिल्हा न्यायालयाकडून श्रीकृष्णजन्मभूमी आणि शाही ईदगाह मशीद वादावर येत्या १९ मे या दिवशी निकाल देण्यात येणार आहे.