मोहाली (पंजाब) येथील ग्रेनेड आक्रमणाच्या प्रकरणी खलिस्तानी आतंकवाद्याला अटक

  • रॉकेट लाँचरही जप्त

  • आक्रमणामागे पाकिस्तामधील खलिस्तान्याचा हात

मोहाली (पंजाब) – येथील पंजाब पोलिसांच्या गुप्तचर विभागाच्या मुख्यालयावर रॉकेट लाँचरद्वारे ग्रेनेड फेकल्याच्या प्रकरणी पोलिसांनी निशान सिंह या खलिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. त्याच्याकडून ‘रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड लाँचर’ही जप्त करण्यात आले आहे. निशान सिंह पंजाबच्या तरणतारण येथील भिखीविंड गावात रहाणारा आहे. हे गाव पाकिस्तानच्या सीमेजवळ आहे. मोहाली आणि फरीदकोट येथील पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्याला फरीदकोट येथून अटक केली.

या आक्रमणाच्या कटात पाकिस्तानात असलेला कुख्यात गुंड आणि खलिस्तानी आतंकवादी हरविंदर सिंह उपाख्य रिंदा याचा हात असल्याचे सांगितले जात आहे. रिंदा याने पंजाबमध्ये ड्रोनद्वारे हे ‘रॉकेट लाँचर’ पाठवल्याचे म्हटले जात आहे. हे ‘रॉकेट लाँचर’ रशियन बनावटीचे आहे. संरक्षण तज्ञांच्या मते रशियाने अफगाणिस्तानच्या सैन्याला अशी शस्त्रे विकली गेली होती. मोहालीमध्ये डागलेले ‘रॉकेट ग्रेनेड’ अमेरिकेने अफगाणिस्तानला आणि नंतर तालिबानने पाकिस्तानला विकले होते.

संपादकीय भूमिका

पंजाबमधील वाढत्या खलिस्तानी आतंकवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकारने आतापासून अशा आतंकवाद्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे !