ग्रंथलिखाणाचे अद्वितीय आणि विलक्षण कार्य करणारे एकमेव परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

परात्पर गुरु डॉ. आठवले

ज्ञानवंत की हो यशवंत की हो कीर्तीवंत ।  बाप माझा हो ज्ञानवंत ।।

वरील भजनपंक्ती प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या गुरूंच्या संदर्भात लिहिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तम शिष्य आणि सनातनच्या सर्व साधकांसाठी प्राणप्रिय असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या संदर्भातही वरील पंक्ती सार्थ ठरते. अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी ग्रंथांच्या माध्यमातून आध्यात्मिक ज्ञानसरिता समाजापर्यंत पोचवणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘ज्ञानवंत’ आहेत ! सनातनच्या ग्रंथांतील ज्ञानामृतामुळे असंख्य जिज्ञासू साधनाभिमुख झाले असून, ८ एप्रिल २०२२ पर्यंत सनातनचे ११४ साधक संत झाले असून, १३४५ साधक संत होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘यशवंत’ आहेत ! अवघ्या २७ वर्षांत, म्हणजे वर्ष १९९५ ते एप्रिल २०२२ पर्यंत ३५४ ग्रंथ-लघुग्रंथांची निर्मिती करणाऱ्या परात्पर गुरु डॉक्टरांचे ग्रंथ-निर्मिती क्षेत्रातील कार्य विलक्षण असून यावरूनही त्यांच्या असामान्य आध्यात्मिक कर्तृत्वाचा परिचय होतो. या दृष्टीने परात्पर गुरु डॉक्टर ‘कीर्तीवंत’ आहेत !

परात्पर गुरु डॉक्टरांची ही ज्ञानगाथा, यशोगाथा आणि कीर्तीगाथा असण्यामागील मुख्य कारण म्हणजे, त्यांच्या ग्रंथकार्याचे नानाविध पैलू ! या पैलूंची माहिती देणारी ही लेखमालिका त्यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त प्रसिद्ध करत आहोत. या मालिकेतील हा पहिला लेख आहे. या लेखात दिलेली सनातनच्या ग्रंथांची वैशिष्ट्ये वाचून सनातनच्या ग्रंथांची आणि त्या योगे परात्पर गुरु डॉक्टरांची थोरवी लक्षात येईल.

४ मे २०२२ या दिवशी ग्रंथातील ‘अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी ‘का अन् कसे ?’ यांची शास्त्रीय उत्तरे !’ आणि ‘अनुभवसिद्ध ज्ञानातून साकारणारे मौलिक विचारधन !’ हे भाग पाहिले. आज पुढील भाग पाहूया.

संकलक : (पू.) संदीप आळशी (सनातनच्या ग्रंथांचे एक संकलक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अध्यात्मातील जिज्ञासूंसाठी ज्ञानाचे एक आगळेवेगळे दालन निर्माण करणाऱ्या सनातनच्या ग्रंथांची अद्वितीय वैशिष्ट्ये !

पू. संदीप आळशी

८. ग्रंथांची काही एकत्रित वैशिष्ट्ये

अ. आनंदप्राप्ती अन् शीघ्र ईश्वरप्राप्ती यांसाठी काळानुसार योग्य साधनेची शिकवण !

आ. अध्यात्माचे तात्त्विक विवेचनच नव्हे, तर साधना कृतीत आणण्याविषयी मार्गदर्शन !

इ. साधनेतील अडचणी दूर करून साधनेला दिशा देणारा दीपस्तंभ !

ई. निरनिराळ्या साधनामार्गांचे तुलनात्मक विवेचन !

उ. ‘अध्यात्म हे चिरंतन टिकणारे एकमेव शास्त्र आहे’, हा सिद्धांत आजच्या विज्ञानयुगातही छातीठोकपणे आणि परखडपणे सांगणारे लेखन !

ऊ. बुद्धीप्रामाण्यवादी व्यक्तींच्या बुद्धीवरील अहंमन्यतेचे आवरण दूर करून त्यांना चिरंतन अशा आनंदाकडे घेऊन जाणारे विवेचन !

ए. अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासातून प्रत्येक व्यक्तीची ऐहिक आणि पारमार्थिक प्रगती साध्य व्हावी अन् अखिल विश्वात सुख, शांती आणि समाधान नांदावे, यांसाठी मार्गदर्शन !

ऐ. ग्रंथांतील सत्त्वगुणी विचारांमुळे वायूमंडलात ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त असलेल्या विचारांचे प्रक्षेपण !

ओ. ईश्वरी तत्त्वरूपी शब्दप्रमाणाला धरूनच प्रत्येक ग्रंथ लिहिला असल्याने एक प्रकारे ईश्वराच्या साक्षीने ग्रंथांची निर्मिती !

औ. ज्ञानातील ईश्वरी चैतन्य, तसेच आनंद आणि शांती यांची अनुभूती देणारे साहित्य  !’

– एक विद्वान (११.७.२०१२) (श्रीचित्शक्ति [सौ.] अंजली मुकुल गाडगीळ यांचे लिखाण ‘एक विद्वान’, ‘गुरुतत्त्व’ आदी नावांनी प्रसिद्ध आहे.)

९. ग्रंथांच्या लिखाणाची मांडणी आणि सात्त्विकतेच्या दृष्टीने विचार

९ अ. लिखाणातील साधेपणा : परात्पर गुरु डॉक्टरांचे लिखाण हे सर्वसामान्यांनाही अगदी सहजपणे कळेल अशा सोप्या भाषेत असते. त्यात जड किंवा अलंकारिक शब्दांचा बडेजावपणा नसतो. एकदा एका ग्रंथासाठीचे एक सूत्र मी (प्रस्तुत लेखाचे संकलक पू. संदीप आळशी यांनी) थोड्याशा अलंकारिक भाषेमध्ये लिहिले होते. ते वाचल्यावर परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘हे लिखाण आपल्या ग्रंथातील वाटत नाही !’’ यावर चिंतन केल्यावर असे लक्षात आले की, साधी-सोपी आणि वाचकांना आपलेसे वाटणारी भाषाशैली ईश्वराला अधिक आवडते; कारण तिच्यात अधिक सात्त्विकता असते.

९ आ. लिखाणाची शास्त्रीय परिभाषा आणि सूत्रबद्ध पद्धतीने मांडणी

१. परात्पर गुरु डॉक्टर हे मुळातच आधुनिक वैद्य (डॉक्टर) असल्याने त्यांना पूर्वीपासूनच शास्त्रीय परिभाषेत लिहिण्याची सवय होती.

२. सध्याच्या विज्ञानयुगातील पिढीला विज्ञानाच्या भाषेत समजावल्यास तिला विषय लवकर समजतो.

वरील कारणांमुळे परात्पर गुरु डॉक्टरांनी शास्त्रीय परिभाषेत ग्रंथ लिहिण्यास आरंभ केला. या दृष्टीने ग्रंथांत विषय स्पष्ट होण्यासाठी आकृत्या, सारण्या, टक्केवारी, सूक्ष्मसंबंधीचे प्रयोग आदी अंतर्भूत केले आहे.

ग्रंथांचे स्वरूप पाठ्यपुस्तकांप्रमाणे असल्याने ग्रंथांतील लिखाण १, १ अ, १ अ १, १ अ १ अ… अशा सूत्रबद्ध पद्धतीने मांडले आहे. सर्वसाधारणतः अध्यात्मावरील कोणत्याही ग्रंथामध्ये अशी पद्धत आढळत नाही; परंतु सनातनच्या ग्रंथांचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे.

९ इ. व्याकरण शुद्ध असण्याकडे कटाक्षाने लक्ष : जेथे परिपूर्णता असते, तेथे शुद्धता असते आणि जेथे शुद्धता असते, तेथे पावित्र्य वास करते. देवळात चैतन्य असले, तरी देवळातील अस्वच्छतेमुळे तेथील चैतन्य न्यून (कमी) होते. तसेच अध्यात्माविषयीच्या लिखाणात चैतन्य असले, तरी लिखाण अशुद्ध असले, तर त्या लिखाणातील चैतन्य न्यून (कमी) होते. यासाठीच परात्पर गुरु डॉक्टरांचा ग्रंथातील लिखाण शुद्ध असण्याकडे कटाक्ष असतो. सनातनचे बरेच साधक त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे, आलेल्या अनुभूती इत्यादी लिहून पाठवत असतात. या लिखाणाचा उपयोग ग्रंथांसाठीही होतो. अशा लिखाण करणाऱ्या सर्वच साधकांना शुद्ध भाषेत लिहिणे सोपे जावे, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतः व्याकरणातील काही नियमांमधील काठिण्य काढून लिखाणात सुसूत्रता आणायचा प्रयत्न केला. ग्रंथांचे लिखाण पडताळतांना एखाद्या शब्दाचे व्याकरण अडल्यास ते स्वतः लगेच साधकांना तो शब्द शब्दकोशात पहाण्यास सांगतात किंवा त्याविषयी जाणकार साधकाला विचारतात. यामुळे ग्रंथांची सेवा करणाऱ्या साधकांमध्येही व्याकरण शुद्ध असण्याविषयी गांभीर्य निर्माण झाले आहे. व्याकरण शुद्ध असल्यामुळे ग्रंथांतील सात्त्विकता वाढायला साहाय्य झाले आहे.

९ ई. संस्कृत सुवचनांमुळे ग्रंथांची सात्त्विकता वाढण्यास हातभार लागणे : वर्ष १९९८ मध्ये ग्रंथ-निर्मितीचे कार्य खऱ्या अर्थाने वेगाने चालू झाले. ‘धर्म’, ‘धर्मग्रंथ’, ‘वर्णाश्रमव्यवस्था’ यांसारख्या ग्रंथांसाठीचे लिखाण सिद्ध करत असतांना त्यांमध्ये विषय स्पष्ट होण्यासाठी एकाच अर्थाची बरीच संस्कृत सुवचने घेतली होती. त्या वेळी माझ्या (प्रस्तुत लेखाचे संकलक [पू.] संदीप आळशी यांच्या) मनात विचार आला, ‘विषय स्पष्ट होण्यासाठी फार तर २ – ३ संस्कृत सुवचने घेतली, तरी ते पुरेसे असते. असे असतांना ८ – १० सुवचने कशासाठी ?’ या प्रश्नाचे उत्तर पुढे वर्ष २००७ मध्ये कळले ! परात्पर गुरु डॉक्टरांनी ग्रंथात घेण्यासाठी एक चौकट दिली. ‘संस्कृत भाषेत चैतन्य पुष्कळ असल्याने ग्रंथात दिलेल्या संस्कृत सुवचनांचा अर्थ कळत नसला, तरी त्यातील चैतन्याचा लाभ होण्यासाठी संस्कृत सुवचने वाचा’, असा त्या चौकटीचा आशय होता. यावरून ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी संस्कृत सुवचनांना इतके महत्त्व का दिले होते’, ते लक्षात आले.

९ उ. लिखाणात स्वभाषेतील शब्दांचाच वापर : सध्या मराठीत बोलतांना परकीय भाषांतील शब्द सहजपणे उच्चारले जातात. मराठी पुस्तके, नियतकालिके, दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आदी सर्वांमध्येच परकीय भाषांतील शब्द सर्रास वापरले जातात. स्वभाषेचे स्थान गौण होत गेल्याने स्वभाषाप्रेम न्यून (कमी) होते. यामुळे आधी स्वदेशप्रेम आणि नंतर स्वधर्मप्रेमही न्यून होते. असे झाल्यावर देशातील जनता हळूहळू निःसत्त्व आणि पौरुषहीन (षंढ) होते. असे होऊ नये यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्वभाषारक्षण आणि भाषाशुद्धी चळवळ’ आरंभ केली. या चळवळीचा एक भाग म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘स्वभाषारक्षण आणि भाषाशुद्धी’ या ग्रंथमालिकेची निर्मितीही केली असून सनातनच्या सर्वच ग्रंथांत कटाक्षाने स्वभाषेतील शब्दांचाच वापर केला जात आहे.

परकीय भाषा या तमोगुणी आहेत, तर संस्कृत भाषेनंतर मराठी, हिंदी, गुजराती अशा सर्वच स्वभाषा सात्त्विक आहेत. हे परात्पर गुरु डॉक्टरांनी वैज्ञानिक उपकरणे वापरून केलेल्या प्रयोगांमध्ये सिद्ध झाले आहे. ग्रंथांत स्वभाषेतील शब्दांचाच वापर केला जात असल्यामुळे सनातनच्या ग्रंथांची सात्त्विकता वाढण्यास साहाय्यही झाले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर स्वभाषारक्षणाचे भरीव कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले हे एकमेवच असतील !

१०. तात्त्विक विवेचनासह उदाहरणे आणि साधकांना आलेल्या अनुभूती

तात्त्विक विवेचनासह समर्पक उदाहरणेही सांगितली, तर विषय कळायला सोपा होतो, यासाठी ग्रंथात ती दिली जातात. साधकांना आलेल्या अनुभूती वाचल्यावर त्यांमधून वाचकांना शिकायला मिळते, तसेच त्यांची श्रद्धा वाढण्यास साहाय्य होते. यासाठी ग्रंथांत अनुभूतीही दिल्या जातात.

(क्रमशः उद्याच्या दैनिकात)