४.५.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे चि. संपत जाखोटिया आणि मूळच्या सोलापूर येथील अन् रामनाथी आश्रमात सेवा करणाऱ्या चि.सौ.कां. (अधिवक्त्या) दीपा तिवाडी यांचा शुभविवाह आहे. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
चि. संपत जाखोटिया आणि चि.सौ.कां. दीपा तिवाडी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. संपत जाखोटिया यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
१. अनेक वर्षांपासून अंथरुणाला खिळून असणाऱ्या आईची मनोभावे सेवा करणे
श्री. संपत यांच्या आई (६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (जीजी) यांचे) तीव्र शारीरिक त्रासामुळे पुष्कळ वर्षांपासून अंथरुणाला खिळून होत्या. या काळात दादांनी प्रतिदिन त्यांची मनापासून सेवा केली. (वर्ष २०२१ मध्ये त्यांचे निधन झाले.)
२. स्थिरता
सौ. जीजी यांचे निधन झाले, त्या प्रसंगी संपतदादा पुष्कळ स्थिर होते. पुढील सर्व कृती त्यांनी शांत आणि स्थिर राहून केल्या.
३. प्रांजळपणा
दादांकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न अल्प झाल्यास ते त्याविषयी व्यष्टी साधनेच्या आढाव्यात प्रांजळपणे सांगतात. एखादी सेवा स्वतःकडून अपूर्ण राहिली असली, तरी त्याविषयी विचारल्यावर दादा तसे प्रांजळपणे सांगतात.
४. तळमळ
मध्यंतरी त्यांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न चांगले होत नव्हते. त्या वेळी त्यांना त्याची पुष्कळ खंत वाटत होती. ‘सेवा तरी अधिक आणि झोकून देऊन करूया’, असा विचार त्यांनी केला. त्यातून त्यांची तळमळ शिकायला मिळाली.
५. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पानांच्या ‘अपलोडिंग’ सेवेचे दायित्व पहाणे
संपतदादांकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘अपलोडिंग’च्या सेवेचे दायित्व आहे. त्या सेवेअंतर्गत दैनिकाच्या पानांवरील बातम्या, लेख आणि अन्य मजकूर संकेतस्थळावर ‘अपलोड’ करणे, संबंधित साधकांचे नियोजन करून त्यांना सेवा देणे, सेवा शिकवणे, तसेच समन्वय करणे या सेवा ते दायित्वाने पहातात. त्यात कितीही अडचणी आल्या, तरी ते त्या शांतपणे सोडवतात.
६. अबोल स्वभावात पालट करणे
दादांचा स्वभाव मुळातच अबोल आहे. त्यामुळे ते आधी कुणाशीही स्वतःहून बोलायचे नाहीत. कुणी त्यांच्याशी बोलायला गेले, तरी दादा अल्पच बोलायचे. व्यष्टी साधनेच्या आढाव्यात आढावासेवक, साधक आणि संत यांनी त्यांना त्यांच्या ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ याविषयी सांगितल्यावर आता दादा सर्वांशी बोलण्याचा प्रयत्न करतात.
– दैनिक ‘सनातन प्रभात’ची सेवा करणारे साधक, सनातन आश्रम, देवद, पनवेल आणि रामनाथी, गोवा. (२०.४.२०२२)
चि.सौ.कां. दीपा तिवाडी यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
१. शिकण्याची वृत्ती
दीपाताईला न्यायालयीन सेवेतील पुढच्या टप्प्याचे शिकायला आवडते.
२. इतरांचा विचार करणे
ती स्वतःच्या विवाहाच्या व्ययाचा (खर्चाचा) कुटुंबियांवर भार यायला नको, यासाठी शक्य तेवढा अल्प व्यय करण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे तिने विवाहासाठी आवश्यक तेवढ्याच वस्तू विकत घेतल्या.
३. साधकांना साहाय्य करणे
अ. साधक ‘ऑनलाईन’ वस्तू खरेदी करतांना ताईचे साहाय्य घेतात. तिला वस्तूंची चांगली पारख आहे. ताई साधकांना ‘अल्प मूल्यात चांगली वस्तू कशी मिळेल ?’, यासाठी प्रयत्न करते.
आ. आम्हाला बऱ्याच वेळा न्यायालयीन सेवेसाठी बाहेर जावे लागते. तेव्हा माझ्याकडून साधकांनी सांगितलेले साहित्य आणणे होत नाही; पण दीपाताईला कोणी एखादे साहित्य आणायला सांगितल्यास ती ते साहित्य आठवणीने आणते.
इ. माझ्या न्यायालयीन सेवेचा आरंभ मी आश्रमात रहात असतांना झाला. दीपाताईने मला ‘न्यायालयात कसे बोलायचे ?’, हे शिकवले. त्यामुळे मी न्यायालयात लवकर बोलू शकले.
४. सेवेची तळमळ
अ. एखादी नवीन सेवा आल्यास ‘ती सेवा अधिक चांगली कशी होईल ?’, अशी ताईला तळमळ असते.
आ. तातडीची सेवा आल्यास ती सेवेसाठी तत्पर असते. आम्हाला सेवेसाठी आवश्यकता लागल्यास आम्ही तिचे हक्काने साहाय्य घेतो.
५. स्वतःला पालटण्याची तळमळ
अ. पूर्वी ताईला राग येऊन तो व्यक्त होत असे; परंतु आता तिच्यात पुष्कळ पालट झाला आहे. आता तिला क्वचित् प्रसंगात राग आला, तरीही तिला त्याची लगेच जाणीव होते.
आ. ‘साधनेत प्रगती व्हावी’, यासाठी तिने स्वतःहून स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आढाव्यांना बसण्याविषयी विचारून घेतले आणि नियमितपणे आढावा दिला.
हे श्रीकृष्णा, तुझ्याच कृपेमुळे मला दीपाताईसारखी आध्यात्मिक मैत्रीण मिळाली, त्याबद्दल तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– अधिवक्त्या (सौ.) अदिती हडकोणकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२२)