शरद पवार यांच्या संदर्भात नियतीचा काव्यागत न्याय !

डावीकडून राज ठाकरे, शरद पवार

‘महाराष्ट्रात सध्या हनुमान चालिसा पठण आणि मशिदीवरील भोंगे या सूत्रांवरुन सामाजिक-राजकीय जीवन ढवळून निघाले आहे. या विषयाच्या आरोप-प्रत्यारोपाच्या धुरळ्यात काळाचा अगाध महिमा अजून एकवार सिद्ध झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि कथित पुरोगामी नेते शरद पवार हे ‘स्वतःची श्रद्धा, भक्ती, देवपूजा ही स्वतःच्या घरापुरती मर्यादित ठेवा’, याचा पुरस्कार करत आहेत. यामुळेच देवपूजा केल्याचे किंवा देवाला नमस्कार केल्याचे त्यांचे छायाचित्र हे कदाचित् अपवादाने प्रसिद्ध झाले असेल; मात्र रमझान काळात ‘इफ्तार पार्टी’चे त्यांचे छायाचित्र वार्षिक रतिबाप्रमाणे झळकते. अशा पुरोगामी पवार यांची आणि त्यांच्या सहकार्यांची ते कसे आस्तिक आहोत, हे दर्शवण्याची केविलवाणी धडपड चालू आहे.

पवार यांची कन्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी, ‘शरद पवार हे नास्तिक नसून तेही हिंदु मंदिरात दर्शनासाठी जातात. त्यांनी अनेक मंदिरांसाठी निधीदेखील दिला असल्याने त्यांच्यावरील नास्तिकतेचा किंवा हिंदुविरोधी असल्याचा आरोप चुकीचा आहे’, असे म्हटले. त्यानंतर पवार यांचे मित्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी ‘शरद पवार यांनी माझ्यासमोर अनेक वेळा आळंदी, देहू यांसारख्या अनेक तीर्थक्षेत्रांना अनेक देणग्या दिल्या आहेत. अनेक सोहळ्यांना सढळ हस्ते देणग्या दिलेल्या मी पाहिल्या आहेत. असा माणूस नास्तिक कसा असू शकतो ?’, असे म्हटले.

शरद पवार यांनी आस्तिक-नास्तिक या वादात ‘मी आस्तिक आहे’, हे यापूर्वी उघडपणे मान्य केलेले नाही. उलटपक्षी हिंदूंना उपदेश करत नास्तिकतावादास खतपाणी घालण्याचे प्रयत्न अनेकवार केले आहेत. या पार्श्वभूमीवर या सप्ताहात पवार नास्तिक नसून आस्तिक असल्याचे सिद्ध करण्याची लंगडी खटपट, हा नियतीने घेतलेला काव्यागत न्याय आणि दैवीपक्षाचा परंपरेने चालत असलेला विजय आहे. यांतून आस्तिकांनी सध्याच्या गदारोळात डगमगून जाऊ नये, उलट ‘अंततः ईश्वरी पक्षाचा, म्हणजेच सश्रद्ध विचारांचा विजय होतो’, हे ध्यानात घेऊन स्वतःची श्रद्धा दृढ ठेवत आस्तिकतेच्या मार्गावर नि:संकोच अन् दमदार वाटचाल करावी.

वास्तविक पहाता पवार यांच्यासारख्या धुरंधर राजकारणी व्यक्तीस पूजा-कर्मकांड करण्याने स्वत: आस्तिक असल्याचे मान्य करणे, हे राजकीय दृष्टीने अडचणीचे असू शकेल. पवार यांना भगवद्गीतेतील कर्मयोगाची व्याख्या चांगलीच अवगत असेल. त्यानुसार ‘मी  कर्मयोग जगतो, त्यामुळे मी आस्तिक आहे,’ असे ते छातीठोकपणे म्हणू शकतात का ? तसेही करणे त्यांना अडचणीचे ठरील. कर्मयोगानुसार आस्तिक आहे, असे म्हटल्यास ‘जय श्रीराम’ म्हणणार्‍या स्वतःच्या नातवाला अनुल्लेखाने मारण्याची शिक्षा का दिली ? हे उघड करावे !’

‘कात्रजचा घाट दाखवणे’, हा वाक्प्रचार पवार यांच्या कार्यशैैलीमुळे रूढ झाला आहे. अशा पवार यांच्यावर ते आस्तिक असल्याची धडपड करावी लागणे, हा नियतीचा काव्यागत न्याय आहे !’

– एक वाचक