सोलापूर – तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असून युवावर्गामध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था कोलमडत असून हे थांबवण्यासाठी ‘कोटपा २००३’ या कायद्याची प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. (कायद्याची कठोर कारवाई न होण्यासाठी प्रशासनाची उदासीन मानसिकता कारणीभूत आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? – संपादक)
श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूरचा तंबाखू नियंत्रण कक्ष आणि मराठवाडा ग्रामीण विकास संस्था संभाजीनगर यांच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय अधिकारी अन् कर्मचारी यांची कार्यशाळा आयोजित केली होती. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, अन्न आणि औषध प्रशासनाचे साहाय्यक आयुक्त नितीन राऊत आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमती शमा पवार म्हणाल्या, ‘‘पुढच्या पिढीला व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी आणि संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी तंबाखूचे सेवन करू नका. तंबाखू खाणार्यांनी ती सोडण्याचा प्रयत्न करावा. कायदा करून तंबाखू सुटणार नाही, तर प्रबोधन होणे आवश्यक आहे.’’
संपादकीय भूमिकाकायदा होऊन इतकी वर्षे लोटल्यानंतर कायद्याची प्रभावी कार्यवाही हवी, हे सांगायला लागते, हे दुर्दैवी ! कायद्याचे पालन का केले जात नाही ? याचा अभ्यास व्हायला हवा, तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई न करणार्यांना शिक्षा होणे अपेक्षित आहे. |