(म्हणे) ‘दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे उदात्तीकरण करणारे राज ठाकरे यांनी क्षमा मागावी !’ – तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे यांची मागणी

श्रीमंत कोकाटे

संभाजीनगर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी लेखक जेम्स लेन याने आक्षेपार्ह लिखाण केले. त्यामागे शिवशाहीर दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांचे डोके होते. मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हे नेहमीच पुरंदरे यांचे समर्थन करतात. यावरून तेही अपर्कीती कटात सहभागी आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची नाक घासून क्षमा मागावी, अशी मागणी तथाकथित विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी २२ एप्रिल या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

ते पुढे म्हणाले की, दिवंगत शिवशाहीर पुरंदरे यांच्या जन्मापूर्वी जोतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. त्यांनीच ९०८ ओळींचा पोवाडा लिहिला. राजर्षी शाहू महाराजांनी शिवस्मारकाची निर्मिती केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजारामशास्त्री भागवत, कृष्णाजी केळुसकर, वा.सी. बेंद्रे, त्र्यंबक शेजवलकर, प्रबोधनकार ठाकरे आदींनी शिवचरित्र लिहिले आणि गावोगावी पोचवले; मात्र बहुजन समाजात महामानव निर्माण झाला, तर त्याचा गुरु एक तर ब्राह्मण असला पाहिजे, हे सिद्ध करण्यासाठी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवचरित्र लिहिले आहे. (ओघवती भाषा आणि सचित्र शिवचरित्र हे पुरंदरे यांच्या शिवचरित्राचे वैशिष्ट्य असल्याने त्यांची पुस्तके घराघरांत लोकप्रिय झाली, हे वादातीत आहे. – संपादक) ‘बहुजन समाजाकडे गुणवत्ता असूच शकत नाही, जी काही गुणवत्ता असते ती फक्त ब्राह्मणांकडेच असते’, हे बिंबवण्यासाठी दिवंगत शिवशाहीर पुरंदरे यांनी शिवचरित्र लिहिले आहे, असा आरोप डॉ. कोकाटे यांनी केला. (स्वतःच्या मनाने काहीतरी हास्यास्पद निष्कर्ष काढून जातीयवादी विधाने करणे याशिवाय श्रीमंत कोकाटे यांना दुसरे येते तरी काय ? – संपादक) सरकारने त्यांना दिलेला महाराष्ट्र भूषण सन्मान पुरस्कार परत घेऊन जिजाऊ आणि शिवराय यांचा सन्मान करावा.

संपादकीय भूमिका 

  • ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेले श्रीमंत कोकाटे !
  • केवळ हिंदु धर्म आणि ब्राह्मण द्वेषापोटी दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना जात्यंधपणातून पहाणारे तथाकथित विचारवंत श्रीमंत कोकाटे !
  • आतापर्यंत खोटा इतिहास सांगून समाजाची दिशाभूल केल्याविषयी कोकाटे यांनीच समस्त हिंदूंची क्षमा मागायला हवी !