देवगड ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे नागरिकांची परवड !

हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर यांची आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार !

देवगड ग्रामीण रुग्णालय

मुंबई, २३ एप्रिल (वार्ता.) – देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात जुलै २०२० मध्ये बसवण्यात आलेली रक्त साठवणुकीची यंत्रणा १८ मासांनंतरही कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना ९० किलोमीटरचा प्रवास करून ओरोस जिल्हा रुग्णालयात जावे लागत आहे. देवगड रुग्णालय प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांची परवड होत आहे. सर्वसामान्यांना होत असलेल्या या त्रासाविषयी हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर

तक्रारीमध्ये अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी म्हटले आहे की, वर्ष २०२० मध्ये बसवण्यात आलेली ही यंत्रणा कोरोनामुळे कार्यान्वित करण्यात आली नव्हती. आता कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्याने सरकारने सर्वत्रचे निर्बंध शिथील केले आहेत; मात्र अद्याप ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही देवगड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णाला रक्ताची आवश्यकता असल्यास ओरोस येथील जिल्हा रुग्णालयातून रक्त आणण्यासाठी अथवा रुग्णाला नेण्यासाठी ९० किलोमीटरचा प्रवास बहुतांश रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाइकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून करावा लागतो. त्यामुळे रक्त मिळण्यास किंवा मिळालेले रक्त पोचण्यास विलंब होऊन रुग्ण दगावू शकतो. रक्त साठवणुकीची यंत्रणा असूनही केवळ ती कार्यान्वित नसल्याने सामान्य नागरिकांना रक्त मिळवण्यासाठी रक्त आटवावे लागत आहे. आरोग्यमंत्र्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालावे आणि रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा तातडीने चालू करण्याचा आदेश देऊन नागरिकांची संभाव्य प्राणहानी टाळावी.

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना ओरोस जिल्हा रुग्णालयाचे शल्यविशारद डॉ. श्रीपाद पाटील म्हणाले की, यंत्राच्या परवान्याचे नूतनीकरण आणि आवश्यक कर्मचारी यांसाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तो संमत होण्यास काही कालावधी जाईल.