साधकाचे साधनेचे प्रयत्न चांगले होत असल्यासच त्याच्याशी आनंदाने बोलणारे, नाहीतर गंभीर राहून साधकांना साधनेसाठी प्रवृत्त करणारे आणि सतत आनंदावस्थेत असलेले पू. सौरभ जोशी !

रामनाथी आश्रमातील संत पू. सौरभ जोशी बहुविकलांग आहेत. त्यामुळे ते सतत पलंगावर पहुडलेले असतात; मात्र त्यांची अंतर्मनातून साधना सातत्याने चालू असल्यामुळे ते सतत आनंदी असतात. ते अंतर्यामीही आहेत. साधकांना केवळ पाहून ‘साधकांची साधना कशी चालू आहे ?’, हे त्यांना समजते. ते अधिक बोलू शकत नाहीत; पण साधकांच्या तोंडवळ्यावरील भाव पाहून ‘साधकांनी साधनेचे चांगले प्रयत्न करायला हवेत’, यासाठी ते त्यांना शिकवतात आणि प्रोत्साहनही देतात. पू. सौरभदादांच्या सेवेत असतांना मला त्यांच्याविषयी जाणवलेली आणि ‘त्यांनी मला कसे शिकवले ?’, या संदर्भातील सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. सौरभ जोशी
कु. कोमल पाटील

१. पू. सौरभदादा सतत आनंदावस्थेत असून त्यांचा आनंदी तोंडवळा पाहूनच मनातील विचार अल्प होऊन पहाणार्‍यालाही आनंद मिळणे

‘पू. सौरभदादा हे सतत आनंदावस्थेत असतात’, असे मला जाणवते. त्यांचे हास्य इतके सुंदर असते की, त्यांच्याकडे पाहिल्यावर लगेच आपल्या तोंडवळ्यावर हास्य उमलते. आपल्याला पाहून त्यांना झालेला आनंद त्यांचा तोंडवळा आणि आवाज यांतून जाणवतो. त्यांना आनंदी पाहिल्यावर मन विचार किंवा प्रसंग यांमध्ये अडकले असले, तरी त्यातून पटकन बाहेर येते.

२. पू. सौरभदादांमधील प्रेमभाव आणि इतरांना सकारात्मक करण्याची त्यांची शक्ती !

२ अ. पू. सौरभदादांमधील प्रेमभावामुळे मनाची नकारात्मक स्थिती पालटून सकारात्मक होणे : मी सेवा किंवा नामजपादी उपाय यांसाठी पू. सौरभदादांच्या खोलीत जाते. काही वेळा खोलीत जातांना माझ्या मनाची स्थिती चांगली नसते किंवा मला कशाचे तरी वाईट वाटत असते आणि मला त्यातून बाहेर पडता येत नसते. अशा स्थितीमध्ये मी पू. सौरभदादांकडे गेल्यावर ते माझ्या तोंडवळ्याकडे पहातात आणि मला ‘बस’ म्हणतात. त्यांच्या ‘बस’, असे म्हणण्यामध्येच इतके प्रेम असते की, माझ्या मनातील नकारात्मक विचार जाऊन मी सकारात्मक होते.

२ आ. पू. सौरभदादांमुळे मन सकारात्मकतेकडे वळून देवाशी बोलू लागणे आणि ‘देवाला या प्रसंगातून काय शिकवायचे आहे ?’, असा विचार होऊन मन शांत होणे : त्यानंतर मन ‘या प्रसंगात माझे काय चुकले ?’, याचा विचार करते आणि देवाशी बोलू लागते. मनातील विचार देवाला सांगू लागताच माझ्या डोळ्यांतून अश्रू यायला लागतात. ते पाहून पू. सौरभदादा हसतात. त्यांचे ते हसणे पाहून मलाही हसू येते. तेव्हा मनाची विचारप्रक्रिया तिथेच थांबून माझे मन शांत होते. मग मनात ‘देवाला मला या प्रसंगातून शिकवायचे होते ?’, असे विचार यायला आरंभ होतो आणि मन हळूहळू सकारात्मक विचारांकडे जायला लागते. ‘पू. सौरभदादा मला त्या प्रसंगातून सहजतेने बाहेर काढतात आणि ‘देव मला यातून काय शिकवत आहे ?’, या दिशेकडे घेऊन जातात.

‘मन अस्थिर असतांना देवाचे विचार ग्रहण करता येत नाहीत’; म्हणून ते अशा प्रकारे मला तिथेपर्यंत आणून सोडतात. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ‘त्यांची प्रीती आणि आनंदावस्थाच सर्वकाही करते’, असे मला वाटते.

३. अंतर्यामी असलेले आणि साधनेचे चांगले प्रयत्न करण्यासाठी प्रवृत्त करणारे पू. सौरभदादा !

आपण बाहेरून तोंडवळा कितीही हसरा ठेवला, तरी ‘आपल्या मनामध्ये काय चालू आहे ?’, हे पू. सौरभदादा क्षणात ओळखतात आणि ‘आपली साधना कशी चालू आहे ?’, हेही ते सांगतात. एकदा मी पू. सौरभदादांच्या खोलीत नामजपादी उपायांसाठी गेले होते. तेव्हा ‘ते गंभीर आहेत’, असे मला वाटले. तेव्हा त्यांच्याशी झालेल्या पुढील संवादातून ‘देवाने माझी साधना नीट चालू नाही’, हे माझ्या लक्षात आणून दिले.

मी (कु. कोमल पाटील) : पू. दादा काय झाले ?

यावर ते काहीच बोलले नाहीत.

मी : पू. दादा तुम्ही ‘श्रीं’च्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) समवेत बोलत आहात का ?

पू. सौरभदादा (हसून) : हो.

(हा प्रश्न त्यांना कधीही विचारला, तरी त्याचे उत्तर ‘हो’ असेच असते.)

मी : पू. दादा, वातानुकूलित यंत्र (ए.सी.) बंद करू का ?

पू. सौरभदादा (गंभीरपणे) : हो.

त्यांनी दिलेले उत्तर मला नेहमीप्रमाणे वाटले नाही. तेव्हाचे त्यांचे बोलणे पाहून मला ‘माझे काहीतरी चुकले आहे’, असे मला वाटले; म्हणून मी देवाला प्रार्थना केली. तेव्हा देवानेच मला काही प्रश्न सुचवले आणि ते मी पू. सौरभदादांना विचारले.

मी : पू. दादा, आज तुम्ही माझ्यावर रागावला आहात का ?

पू. सौरभदादा : हो.

मी : माझी काही चूक झाली का ? मी ‘श्रीं’ना अपेक्षित अशी साधना करत नाही; म्हणून का ?

पू. सौरभदादा : हो.

त्यांनी असे सांगितल्यानंतर मी देवाची आणि परात्पर गुरु डॉक्टर यांची क्षमा मागितली अन् त्यांच्या चरणी प्रार्थना केली. तेव्हा पू. सौरभदादा हसले.

मी : माझे प्रयत्न अतिशय अल्प होत आहेत ना ?

पू. सौरभदादा : हो.

मी : मी साधनेचे प्रयत्न वाढवते. (मी हात जोडून) मी साधनेचे प्रयत्न वाढल्यावर तुम्ही माझ्याशी बोलणार ना ?

पू. सौरभदादा : हो.

एरव्ही माझा प्रश्न संपला की, पू. सौरभदादा लगेच उत्तर द्यायचे; पण या वेळी त्यांनी बराच वेळ अबोला धरून ‘माझ्याकडून अपेक्षित असे प्रयत्न होत नाहीत’, याची मला जाणीव करून दिली. या संवादातून त्यांनी ‘माझी साधना चांगली चालू आहे’, हा माझा भ्रम दूर केला आणि ‘अजून कसे प्रयत्न करायला हवेत ?’, याचे मला चिंतन करायला लावले. यातून मला माझ्या चुकांची जाणीव झाली आणि प्रयत्नांना दिशा मिळाली.

४. ‘देवच सर्वकाही करून घेत असतो’, हे पू. सौरभदादा यांच्याकडून शिकायला मिळणे

‘देवाला अशक्य असे काहीच नाही’, हे सर्वांनाच ठाऊक आहे. आपल्याला याची प्रचीती येतच असते. मनाचा संघर्ष होऊन ‘ईश्वरप्राप्ती’ हा मार्ग निवडणे, म्हणजे देवाने घेतलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होणे ! यानंतर साधनेच्या पुढच्या स्थितीला जाण्यासाठी आणि देवाला अपेक्षित अशी साधना होण्यासाठी आपले मन देवाच्या चरणी अर्पण करावे लागते. आपल्याला इथपर्यंत देवानेच आणले आहे आणि या पुढेही तोच आपल्याला नेणार आहे. देवच आपल्याला साधनेचे विचार देतो आणि प्रत्येक स्थितीत सकारात्मक राहून सर्वकाही स्वीकारण्याच्या स्थितीत ठेवतो. आपण आपले मन देवाला अर्पण करून संपूर्ण शरण गेल्यावर देवच आपल्याकडून प्रत्येक कृती करवून घेतो आणि ‘यातच अधिक आनंद आहे’, हे मला पू. सौरभदादांच्या सेवेतून शिकायला मिळाले.

५. कृतज्ञता

देवाने मला संतसेवा दिली आणि त्यातून पुष्कळ शिकवले. यासाठी भगवान श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.

– कु. कोमल पाटील, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.३.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक