बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा पात्रीकर (कथ्थक अलंकार) यांची रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

‘१८ ते २२.४.२०२२ या कालावधीत बोरीवली (मुंबई) येथील कथ्थक नृत्यांगना सौ. मनीषा जयंत पात्रीकर आणि त्यांचा मुलगा कु. सोहील पात्रीकर (वय १७ वर्षे), हे दोघे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्यास आहेत. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी त्यांना आश्रम दाखवून आश्रमात चालणाऱ्या राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांविषयीच्या कार्याची ओळख करून दिली. आश्रमातील त्यांच्या वास्तव्याच्या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने त्यांचे कथ्थक नृत्यातील काही प्रकारांचे संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले.


सौ. मनीषा जयंत पात्रीकर यांचा परिचय

सौ. मनीषा जयंत पात्रीकर

सौ. मनीषा जयंत पात्रीकर या कथ्थक नृत्यांगना आहेत. त्या मूळच्या नागपूर येथील असून सध्या त्या बोरीवली (मुंबई) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नृत्याचे शिक्षण नागपूर येथील (कै.) सौ. साधना नाफडे यांच्याकडे झाले. त्यांनी कथ्थक नृत्यामध्ये ‘अलंकार’ ही पदवी प्राप्त केली असून त्यांनी एकल (सोलो) नर्तनाचेही कार्यक्रम केले आहेत. त्या ‘नृत्य निर्झर’ या नृत्यसंस्थेच्या संस्थापिका आहेत. त्या संत मेहेरबाबा यांच्या संप्रदायानुसार साधनारत आहेत.

आश्रम पहातांना सौ. मनीषा पात्रीकर आणि त्यांचा मुलगा कु. सोहील पात्रीकर (वय १७ वर्षे) यांना जाणवलेली सूत्रे

कु. सोहील पात्रीकर

सौ. मनीषाताई आणि कु. सोहील यांनी घाई न करता संपूर्ण आश्रम जिज्ञासेने पाहिला अन् आश्रमात चालणारे सगळे कार्य जाणून घेतले. आश्रम पहातांना त्यांना पुढील सूत्रे जाणवली.

१. सौ. मनीषाताईंनी सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहिले आणि अनिष्ट शक्तींच्या संदर्भातील माहिती करून घेतली. त्या वेळी ‘आम्हालाही असे अनुभव आले आहेत’, असे त्यांनी सांगितले.

२. आश्रमातील लाद्यांवर आपोआप उमटलेले ‘ॐ’ पाहून मनीषाताईंची भावजागृती झाली.

३. स्वागतकक्षातील श्रीकृष्णाचे चित्र पाहून ते पुष्कळ सजीव असल्याचे मनीषाताई आणि सोहील यांना जाणवले, तसेच चित्रातील श्रीकृष्णाच्या डोळ्यांत पुष्कळ शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.

४. ‘आश्रमात पुष्कळ दैवी ऊर्जा आहे’, असे मनीषाताई म्हणाल्या. साधकांकडे पाहून त्यांना आपलेपणा आणि प्रेम जाणवले.

५. सूक्ष्म ज्ञानाविषयीची चित्रे पाहून मनीषाताई आणि सोहील यांना या अभ्यासाविषयी कुतूहल वाटले अन् त्याविषयीची माहिती मिळाल्याबद्दल त्यांना आनंदही झाला.

६. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांच्या कार्याविषयीही मनीषाताई अन् सोहील यांनी चर्चा केली. कु. सोहील याच्या मनात हिंदु धर्मावर होणाऱ्या आघातांविषयी खंत असून ‘या संदर्भात योग्य ते व्हायला हवे’, असे तो म्हणाला. ‘समाजातील हिंदु धर्माच्या बिकट स्थितीविषयीचा त्याचा अभ्यास चांगला आहे’, असे जाणवले.

७. संगीताच्या (गायन, वादन आणि नृत्य यांच्या) संदर्भातील आध्यात्मिक स्तरावर केलेले संशोधनाचे कार्य पाहून ‘असेही संशोधन करता येते’, याचे मनीषाताईंना आश्चर्य वाटले. त्यांनी जिज्ञासेने प्रश्न विचारून संशोधन जाणून घेतले. ‘मलाही या संशोधनात सहभागी व्हायला आवडेल’, असे त्या म्हणाल्या.

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.४.२०२२)

आजकाल नृत्यातील बीभत्सपणा वाढल्यामुळे सौ. मनीषा पात्रीकर यांनी विविध कार्यक्रमांमध्ये परीक्षक म्हणून, तसेच चित्रपटात नृत्य संरचना (कोरोओग्राफी) करण्यासाठी जाणे बंद करणे

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर

‘सौ. मनीषा पात्रीकर म्हणाल्या, ‘‘आजकाल लहान मुले-मुली चित्रपट गीते, तसेच रिमिक्स गीते (टीप) यांवर बीभत्स नृत्य करतात. अशा नृत्याच्या स्पर्धांमध्ये मला परीक्षक म्हणून बोलावले जाते; परंतु लहान मुलांनी या वयात अशा स्वरूपाच्या गाण्यांवर नृत्य करणे अतिशय चुकीचे आहे. आज त्या मुलांना योग्य दिशा देणारे कुणीही नाही. लहान वयातच ही मुले प्रसिद्धी आणि लोकेषणा यांमध्ये अडकतात. त्यांच्या कलेला योग्य दिशा मिळत नाही; म्हणून मी आजकाल अशा कार्यक्रमांना परीक्षक म्हणून जातच नाही. चित्रपटातसुद्धा नृत्य संरचना (कोरोओग्राफी) करण्याच्या दृष्टीने मला निमंत्रण आले, तरी मी ते स्वीकारत नाही; कारण ‘या क्षेत्रात जाऊन कलेची हानी होईल आणि कलेच्या माध्यमातून जो उद्देश साध्य करायचा आहे, तो साध्य होण्यास अडचण येईल’, असे मला वाटते.’’

टीप – संगीत आणि वाद्य जोडून जुन्या गाण्यांना नवीन संगीत देणे.’

– सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर, नृत्य अभ्यासिका, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.४.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.