पाचवीचा वर्गच नसलेल्या शाळेत मुश्रीफ यांचे नाव कसे ? – समरजितसिंह घाटगे, भाजप

श्री. समरजितसिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ

कागल (जिल्हा कोल्हापूर), २१ एप्रिल (वार्ता.) – ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शाळेच्या दाखल्यामध्ये जन्मदिनांकाच्या नोंदीमध्ये फरक असून ‘पॅनकार्ड’ आणि शाळेचा दाखला यांच्यामध्ये जन्मदिनांक वेगवेगळा आहे. ज्या शाळेला पाचवीचा वर्गच नव्हता, अशा शाळेत पाचवीमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. आता खोटे आणि बनावट दाखलेही शोधावे लागतील, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. समरजितसिंह घाटगे यांनी केले आहे. ते कागल येथे पत्रकारांशी बोलत होते.

श्री. घाटगे पुढे म्हणाले, ‘‘हिंदुराव घाटगे शाळेमध्ये मंत्री मुश्रीफ यांचा हसनसाहेब असा उल्लेख करण्यात आलेला आहे, तर जन्माला आले त्याच वेळेला हसनसाहेब असे नाव कसे ? कार्यकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुख्याध्यापकांनी शाळा दाखला सिद्ध केला आहे. वर्ष १९५३ चा जन्मदाखला गृहीत धरला, तर आठव्या वर्षी हसन मुश्रीफ पाचवीमध्ये होते, तर पहिलीमध्ये त्यांचे वय किती असेल ? हसन मुश्रीफ यांचे मूळ कोणतेच दाखले नसल्याने ते अयोग्य कागदपत्रे सिद्ध करून घेत आहेत. यामुळे यापुढील काळात ते अडचणीत येणार आहेत.’’