पाकिस्तानच्या वायूदलाने अफगाणिस्तानच्या सीमेवरील खोस्त आणि कुनार प्रांतांवर ‘एअर स्ट्राइक’ केला. ‘यात ४७ जण ठार झाले असून यात महिला आणि मुले यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे’, असे अफगाणिस्तानने म्हटले आहे. या घटनेमुळे अफगाणिस्तानने पाकच्या राजदूतांना याविषयी जाब विचारला आहे. ‘पाकने आमच्या संयमाची परीक्षा पाहू नये’, अशी थेट धमकी अफगाणिस्तानमधील सत्ताधारी तालिबानने पाकला दिली आहे. कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून वागणारे दोन्ही मुसलमान देश आज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचे दिसत आहे. यात विशेष असे काहीच नाही. मुसलमान जेथे संख्येने अधिक असतात, तेथे ते एकमेकांच्या विरोधात लढतात आणि शेजारी देश असतील, तर एकमेकांसमवेत कधीतरी युद्ध करतातच, हे आखाती देशातील अनेक उदाहरणांवरून आतापर्यंत दिसून आले आहे.
तोच प्रकार आता या २ देशांत चालू झाल्याचे पहाण्यास मिळत आहे. पाक आणि अफगाण सीमेवरून कारवाया करणाऱ्या ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेकडून गेल्या काही वर्षांपासून पाकमध्ये आतंकवादी कारवाया केल्या जात आहेत. पाकिस्तानने तालिबानला अफगाणिस्तानचे सरकार उलथवून तेथे सत्ता स्थापन करण्यास पुरेपूर साहाय्य केले होते. त्या वेळी तालिबानने या आतंकवादी संघटनेला ‘पाकमध्ये कारवाया करू नयेत’, असे बजावलेही होते, तरीही ही संघटना कारवाया करत आहे. पाकच्या सैनिकांना लक्ष्य करून त्यांना ठार करत आहे. यामुळेच पाकने या संघटनेला धडा शिकवण्यासाठी त्याच्या अफगाणिस्तानमधील ठिकाणांवर ‘एअर स्टाइक’ केला; मात्र यात महिला आणि मुले यांचाच मृत्यू झाल्याने अफगाणिस्तान संतप्त झाला आहे. ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ संघटनेला पाकमध्ये तालिबानी राजवट आणायची आहे’, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. ज्या पाकने अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य केले, त्या पाकला त्याच्या देशात तालिबान नको आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे ! आता पाकच्या या आक्रमणामुळे तालिबान सरकारने ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ला सर्वप्रकारचे साहाय्य करून पाकवर आणखी भीषण आक्रमणे करण्यास सांगितले, तर ते पाकला झेपणार आहे का ? आणि ‘पाक याचे प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारच्या विरोधात जाऊन तेथे आक्रमण करण्याचे धाडस दाखवणार आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन पुढे त्यांच्यात यादवी होत असेल, तर ते भारतासाठी चांगलेच आहे. ‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे.