आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! – तालिबानची पाकला चेतावणी

पाकने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ‘एअर स्ट्राइक’चे प्रकरण

तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद

काबूल (अफगाणिस्तान) – पाकिस्तानच्या वायूदलाने १६ एप्रिलच्या रात्री अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार प्रांतात केलेल्या ‘एअर स्ट्राइक’मध्ये (नियंत्रित आक्रमणामध्ये) ४७ जणांचा मृत्यू झाला. यात महिला आणि लहान मुले यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याने तालिबान सरकार संतप्त झाले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद याने केलेल्या ट्वीटमध्ये ‘पाकने अशा प्रकरणांत अफगाणच्या संयमाचा अंत पाहू नये. अशी चूक पुन्हा झाली, तर त्याचे गंभीर परिणाम होतील. दोन्ही देशांतील समस्यांवर राजकीय मार्गाने तोडगा काढला गेला पाहिजे’ असे म्हटले आहे. पाकच्या आक्रमणानंतर सहस्रो अफगाणी लोकांनी रस्त्यावर उतरून पाकचा निषेध केला. पाक सरकारने या आक्रमणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या ‘एअर स्ट्राइक’च्या माध्यमातून ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या आतंकवादी संघटनेच्या आतंकवाद्यांना लक्ष्य करण्यात आले होते. यापूर्वी या संघटनेच्या आतंकवाद्यांनी पाकच्या सैन्याला लक्ष्य केले होते.

अफगानिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या आक्रमणाचा तीव्र शब्दांत निषेध करत पाकिस्तानचे राजदूत मंसूर अहमद खान यांना जाब विचारला आहे.