‘भारताला डिवचल्यास सोडणार नाही’, हा संदेश चीनला गेला आहे !  

राजनाथ सिंह यांची अमेरिकेतून चीनला थेट चेतावणी

‘भारताला कुणीही डिवचण्याचा विचारही मनात आणू नये’, अशी पत भारताने निर्माण केली पाहिजे ! पाक जिहादी आतंकवाद्यांद्वारे काश्मीरमध्ये हिंदूंना, तसेच सुरक्षादलांना लक्ष्य करत आहे, त्याचा कायमचा बंदोबस्तही करण्याची आवश्यकता आहे ! – संपादक

भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

सॅनफ्रान्सिस्को (अमेरिका) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत बलशाली देश बनला आहे. आता जगातील मोठ्या ३ अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश केला जातो. त्यामुळे ‘भारताला कुणी डिवचल्यास आम्ही त्यांना सोडणार नाही’, हा संदेश चीनला गेला आहे, अशी चेतावणी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. ते अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीय समुदायासमोर बोलत होते.

रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले होते. यासंदर्भात अमेरिकेचे नाव न घेता राजनाथ सिंह यांनी ‘भारताचे एका देशाशी चांगले संबंध आहेत, याचा अर्थ दुसर्‍या देशाशी संबंध वाईट व्हावेत, असे नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरील संबंध ठेवत असतांना दोन्ही देशांना लाभ व्हावा, या धोरणावर भारत कायम विश्‍वास ठेवतो’, असे म्हटले.