डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक (वय ६६ वर्षे) यांनी संगीत साधनेविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !
डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील पू. किरण फाटक हे ‘संगीत अलंकार’ असून गेल्या ३० वर्षांपासून डोंबिवली येथे ‘भारतीय संगीत विद्यालया’च्या माध्यमातून मुलांना शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत आहेत. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांसाठी, तसेच अन्य संगीत कार्यक्रमांना त्यांना परीक्षक म्हणून बोलावले जाते. ते श्री स्वामी समर्थ यांचे निस्सीम भक्त आहेत. त्यांना स्वामी समर्थांवर विविध काव्ये आणि भक्तीपर कवने स्फुरली आहेत.
‘संगीत क्षेत्रातील नवोदित विद्यार्थ्यांनी संगीताकडे साधना (उपासना) म्हणून कशा प्रकारे पहावे ?’, याविषयीचे मौलिक मार्गदर्शन पू. किरण फाटक यांनी काही लेखांमधून केले आहे. त्यांच्या या लेखांमधून संगीताकडे पहाण्याचा एक वेगळा दृष्टीकोन संगीत क्षेत्रातील कलाकारांना मिळू शकेल.
– सुश्री (कुमारी) तेजल पात्रीकर (संगीत विशारद, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा (३१.३.२०२२)
१. स्वर दिसण्यासाठी गुरूंच्या सान्निध्यात स्वरांचा सराव करावा !
‘गेली ४० वर्षे मी संगीतक्षेत्रात आहे. या कालखंडात मी अनेक विद्यार्थी पाहिले आणि जाणून घेतले. स्वर हा संगीताचा आत्मा आहे. तो निर्गुण आहे. ‘सर्व स्वर डोळ्यांसमोर येणे आणि ते गळ्यातून अचूक निघणे’, हे विद्यार्थ्याचे परिश्रम अन् अनुसंधान यांवर अवलंबून असते. ‘स्वर दिसावा’, असे अंतःकरणापासून वाटणे आणि ते दिसण्यासाठी गुरूंजवळ बसून जिवापाड सलग परिश्रम करणे’, हे विद्यार्थ्याला जमायला हवे. त्यासाठी गुरुसान्निध्यात रियाज (सराव) करणे आवश्यक असते; कारण ‘अमुक स्वर दिसत नाही (डोळ्यांसमोर येत नाही)’, हे विद्यार्थ्याला समजत नाही. मग तो चुकीचा रियाज करण्याचा संभव असतो.
२. काही विद्यार्थी जन्माला येतांनाच काही स्वरांचा आंधळेपणा घेऊन येतात, तर काही परिस्थितीशी दोन हात करता करता एखादा-दुसरा स्वर हरवून बसतात.
३. सर्व दिशांनी संगीताचा भीषण मारा चालू असल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत असणे
आज समाजातून सुख, समाधान आणि आनंद न्यून होत चालले आहेत. जीवन व्यस्त आणि बऱ्याच अंशी त्रस्त झाले आहे. कोलाहल वाढला आहे. सूक्ष्म नाद ऐकण्याची कानांची शक्ती न्यून होत चालली आहे. ध्वनीप्रदूषण बरेच वाढत आहे. अशा विचित्र परिस्थितीत संगीत ऐकण्यातील आनंद न्यून होता कामा नये. संपर्कमाध्यमांची गर्दी आणि प्रचंड शक्ती यांमुळे संगीताचा सर्व दिशांनी भीषण मारा चालू झाला आहे. ‘हे ऐकू कि ते ऐकू ?’, ‘हे घेऊ कि ते घेऊ ?’, या प्रश्नांनी विद्यार्थी गोंधळून गेला आहे. ‘ऐकल्यावर त्यावर विचार करणे, ते अंगीभूत करणे’, यांसाठी विद्यार्थ्याकडे वेळच नाही. सुरांनी गर्दी केल्यामुळे एकाही सुराशी मैत्री होत नाही. केवळ तोंडओळख होते.
४. आजकाल जीवनात विशेष माधुर्य न उरल्याने १२ स्वरांतील ‘शुद्ध ‘म’ हा मधुर स्वर काहीसा कठोर होणे
माझ्या अनुभवावरून मी सांगेन, ‘शुद्ध ‘म’ हा स्वर लक्षात न येणारे बरेच विद्यार्थी असतात. ‘शुद्ध ‘म’ हा स्वर माधुर्याने ओतप्रोत भरलेला आहे. माझ्या मते आजच्या युगातील जीवनात हे माधुर्य, मार्दव विशेष उरलेले नाही. याची अनेक कारणे असू शकतील.
विभक्त कुटुंबपद्धत, शिक्षणाचे बाजारीकरण, समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार, बेकारी, जातीमुळे भंगत जाणारी समाजव्यवस्था, जीवनाची वाढलेली गती आणि मती विचलित करणारी समाजमाध्यमे (वृत्तवाहिन्या (टीव्ही न्यूज चॅनल्स)) यांमुळे समाजातील माधुर्य, मार्दव, तसेच संवेदनशीलता यांना नक्कीच ओहोटी लागली आहे; म्हणूनच १२ स्वरांतील (टीप १) ‘म’ हा मधुर स्वर काहीसा कठोर बोलू लागला आहे.
टीप १ – ७ शुद्ध स्वर (टीप २), ४ कोमल स्वर (टीप ३) आणि १ तीव्र स्वर (टीप ४), असे एकूण १२ स्वर आहेत.
टीप २ – जेव्हा सातही स्वर आपल्या मूळ जागेवरच असतात, तेव्हा त्यांना ‘शुद्ध स्वर’, असे म्हणतात.
टीप ३ – जे स्वर आपली मूळ जागा सोडून अल्प उंचीवर येतात; परंतु मागील स्वरापेक्षा अधिक उंचीवर असतात, त्यांना ‘कोमल स्वर’, असे म्हणतात.
टीप ४ – जो स्वर आपली मूळ जागा सोडून अधिक उंचीवर जातो; परंतु पुढील स्वरापेक्षा अल्प उंचीवर असतो, त्याला ‘तीव्र स्वर’, असे म्हणतात.
५. ‘प’ हा स्वर नीट न लागल्याने होणारा परिणाम
सप्तकातील ‘प’ हा स्वर अतिशय महत्त्वाचा आहे. ‘तो तंबोऱ्याशी कसा एकरूप होतो ?’, हे अनुभवण्यात मोठा आनंद आहे. जर हा स्वर नीट लागला नाही, तर पुढील उत्तरांगातील सर्व स्वर कणसुर (टीप ५) लागतात. त्यामुळे गायन अर्धांगवात झाल्यासारखे होते. ‘प’ हा स्वर पाठीच्या कण्यासारखा असतो. त्याला पुष्कळ जपून, समजून-उमजून गावे लागते.
टीप ५ – एखादा स्वर गातांना किंवा वाजवतांना त्याच्या आधी किंवा पुढे येणाऱ्या स्वराला अलगद स्पर्श करून तो म्हटला किंवा वाजवला असता त्या स्वरांना ‘कणसुर’ किंवा ‘कणस्वर’, असे म्हणतात.
५ अ. एका परीक्षार्थीनीला तार सप्तकातील ‘ग’पर्यंत सर्व सूर अचूक लावत व्यवस्थित गाता येणे; पण तिचे ‘प’च्या खालचे स्वर बेसूर होणे : माझा एक विलक्षण अनुभव मी तुम्हाला सांगतो. एका केंद्रावर मी परीक्षक म्हणून गेलो होतो. प्रगत परीक्षेला एक मुलगी होती. तिने राग ‘पुरिया धनश्री’ चालू केला; पण तिचा पहिला ‘सा’ लागेना. बरेच प्रयत्न झाले. ती तशीच गात गात पंचमापर्यंत आली आणि आश्चर्य असे की, पुढे अगदी तार सप्तकातील (टीप ६) ‘ग’पर्यंत सर्व सूर अचूक लावत ती व्यवस्थित गाऊ लागली. परत ‘प’च्या खाली आल्यावर पूर्ण बेसूर होऊ लागली. मी तिची गाण्याची पट्टी (आधारस्वर) पालटून पाहिली. पण छे ! तिला सप्तकाचे पूर्वांग सापडतच नव्हते. यालाच मी ‘स्वरांधळेपणा’ म्हणतो.
टीप ६ – तार सप्तकातील स्वर गातांना निघणारा नाद हा तोंडातील ‘टाळू’ या शरिराच्या स्थानातून निर्माण होतो.
६. विद्यार्थ्यांना एकमेकांना लागून असलेल्या स्वरांतील अंतराचे आकलन होत नसणे
सप्तसुरांत ‘शुद्ध ‘ग’ आणि ‘शुद्ध ‘म’ हे स्वर एकमेकांना लागून आहेत, तसेच ‘शुद्ध ‘नी’ आणि ‘सां’ हे एकमेकांना लागून आहेत. या दोन स्वरांतील अंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना कळत नाही. ‘तीव्र ‘म’, ‘प’ आणि ‘कोमल ‘ध’ हे ३ स्वर बऱ्याच विद्यार्थ्यांना लागोपाठ गाता येत नाहीत; कारण हे तिन्ही स्वर एकमेकांना लागून आहेत. विद्यार्थ्यांना त्या स्वरांतील अंतराचे आकलन होत नाही. ते विद्यार्थ्यांना वेगवेगळे दिसतच नाहीत.
७. बरेच विद्यार्थी विवक्षित स्वर म्हणायला टाळत असणे
अ. बरेच विद्यार्थी ‘भैरव’ या रागात ‘कोमल ‘रे’ पहिल्या ‘सा’मध्ये मिसळून टाकतात. या विद्यार्थ्यांना ‘कोमल ‘रे’ गाणे नकोसे वाटते. याला मी ‘स्वराची ॲलर्जी’, असेही म्हणेन.
आ. विद्यार्थ्यांना विवक्षित (विशेष लक्षणयुक्त वा काहीतरी ठळक गुण असलेल्या) स्वराची ॲलर्जी असते. कुणाला ‘ग’ नको वाटतो, तर कुणाला ‘ध’ नको वाटतो, तर कुणाला ‘शुद्ध ‘नी’ नकोसा वाटते. गातांना हे विद्यार्थी तो विवक्षित स्वर टाळण्याचा (‘स्किप’ करण्याचा) प्रयत्न करतात. ‘या ॲलर्जीचा संबंध मानसिक दोलायमान अवस्थेशी असावा’, असे मला वाटते. हा माझा वैयक्तिक निष्कर्ष आहे.
इ. ‘प्रत्येक स्वराचा संबंध विवक्षित स्वभावदोषाशी असावा आणि जर तो स्वर त्या विद्यार्थ्याला समजला, तर त्या विद्यार्थ्यांतील तो स्वभावदोष नाहीसा होऊ शकेल’, अशी माझी धारणा आहे. यावर संशोधन होणे आवश्यक आहे.
‘कठोर परिश्रम, डोळसपणा, जगण्याच्या पद्धतीतील पालट आणि नियमित रियाज (सराव)’, यांमुळे विद्यार्थी या ‘स्वरांधळेपणा’वर नक्कीच मात करू शकतो’, असे माझे ठाम मत आहे.’
(महत्त्वाची टीप : या लेखातील सर्व मते ही माझी अनुभवसिद्ध मते आहेत. ती प्रयोगाने सिद्ध झालेली नाहीत.)’
– (पू.) किरण फाटक, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१४.६.२०२१)