मुंबई, १५ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रातील खासगी शाळांच्या बसगाड्यांमध्ये ‘जीपीएस् ट्रॅकर’ बसवावा, अशी मागणी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासाठी सौ. पेडणेकर यांनी १२ एप्रिल या दिवशी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते.
मार्च २०२२ मध्ये मुंबईतील सांताक्रूज येथील ‘पोद्दार इंटरनॅशनल स्कूल’ या खासगी शाळेची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सुटल्यानंतर ३ घंटे विलंबाने पोचली. विद्यार्थ्यांशी संपर्क न झाल्यामुळे या कालावधीत पालक चिंतीत होते. पोलिसांच्या साहाय्याने बसचा शोध घेण्यात आला; मात्र या सर्व प्रकाराचा पालकांना मोठा मनस्ताप झाला. ही घटना सौ. किशोरी पेडणेकर यांनी पत्रामध्ये नमूद करत भविष्यात अशा प्रकारची घटना टाळण्यासाठी बसमध्ये ‘जीपीएस् ट्रॅकर’ प्रणाली बसवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बस कुठे आहे ? याचे ठिकाण पालक, तसेच शाळेचे व्यवस्थापन यांना कळू शकेल.