ठाणे येथील सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा प्रविष्ट !

राज ठाकरे

ठाणे, १३ एप्रिल (वार्ता.) – ठाणे येथे १२ एप्रिल या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करत मनसेच्या वतीने राज ठाकरे यांच्या उत्तर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला मनसेचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज ठाकरे यांना भाषणापूर्वी तलवार भेट देण्यात आली. या प्रकरणी नौपाडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला आहे.

सभेसाठी राज ठाकरे उपस्थित होतांना त्यांचे कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जोरदार स्वागत केले. तेव्हा सभेचे आयोजन करणाऱ्या मनसैनिकांनी राज ठाकरे यांच्याकडे तलवार सुपुर्द करत ती उपस्थितांना दाखवण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज ठाकरे यांनी ती तलवार उपस्थितांना दाखवली; मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे तलवारीचे प्रदर्शन करणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे याची नोंद घेत येथील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि मनसेच्या ठाणे-पालघर जिल्ह्यांचे अध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह ७ ते ८ मनसैनिकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.