संभाजीनगर येथे रात्री १० वाजल्यानंतर मशिदींचे भोंगे वाजले, तर ते काढून फेकणार !

  • करणी सेनेचे सूरजपालसिंह अम्मू यांची चेतावणी

  • नमाजपठणासाठी नव्हे, तर चालण्यासाठी रस्ते आहेत !

संभाजीनगर – रात्री १० वाजल्यानंतर शहरातील मशिदींवरील भोंगे वाजले, तर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी भोग्यांना तोडून फेकून द्यावे, अशी घोषणा करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपालसिंह अम्मू यांनी येथे केली. न्यायालयाचा निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सिद्ध केलेल्या राज्यघटनेनुसार देश चालत असून उच्च न्यायालय त्याचा एक भाग आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. येथील ‘एम्.जी.एम्.’च्या रुक्मिणी सभागृहात १० एप्रिल या दिवशी आयोजित केलेल्या करणी सेनेच्या महासंमेलनात ते बोलत होते.

या वेळी करणी सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष देविचंदसिंह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, आमदार अंबादास दानवे, शिवचैतन्य महाराज, आमदार उदयसिंग राजपूत, करणी सेनेच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा राखी गर्ग, प्रदेशच्या अधिवक्त्या संध्या राजपूत आदींची उपस्थिती होती.

‘१५ मिनिटे पोलिसांना हटवा…’ असे वक्तव्य करणारे ओवैसी यांचा समाचार घेतांना सूरजपाल सिंह अम्मू म्हणाले, ‘‘५ मिनिटे देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, मी ओवैसी यांना पाकिस्तान सीमेवर सोडतो.’ रस्ते मनुष्याला चालण्यासाठी आहेत, नमाजपठणासाठी नाहीत. रस्त्यांवर नमाजपठण केले, तर आम्ही हनुमान चालिसा चालू करू, अशी चेतावणी त्यांनी दिली. करणी सेना ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आदर्शावरील हिंदुत्वाचा पुरस्कार करत आहे, असे सूरजपालसिंह अम्मू यांनी सांगितले.