पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांविषयी लागू असलेले कायदे गेल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट भेदभाव करणारे ठरले आहेत. निवडणूक, कौटुंबिक, जकात, नागरिकत्व, धर्मविरोधी गुन्हे यांविषयीचे कायदे इत्यादी कायद्यांच्या अंतर्गत धार्मिक अल्पसंख्यांकांवर अत्यंत अत्याचार केले जात आहेत. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक हिंदु आणि शीख महिलांवरील अत्याचार यांनी परिसीमाच गाठली आहे. या अल्पसंख्यांकांतील महिला आणि मुली बलात्कार, अपहरण, बलपूर्वक धर्मांतर करून निकाह यांचे बळी ठरत आहेत. अल्पवयीन हिंदु मुलींचे मोठ्या प्रमाणात बलपूर्वक धर्मांतर घडवून आणले जात आहे. अशा धर्मांतराला बळी पडलेल्या अल्पवयीन हिंदु मुलींच्या व्यथा प्रसिद्ध झाल्या आहेत, तसेच या अल्पवयीन हिंदु मुलींवर धर्मांतरासाठी दबाव आणणार्या धर्मांध घटकांविषयीही माहिती प्रसिद्ध झाली आहे.
१. ‘बलपूर्वक धर्मांतर आणि निकाह कायदा’ अवैध ठरवण्याचा सिंध सरकारचा अयशस्वी प्रयत्न
‘बलपूर्वक धर्मांतर आणि बलपूर्वक निकाह कायदा’ अवैध ठरवणे आणि अल्पसंख्यांक सुरक्षा विधेयकामध्ये न्यायालयीन प्रक्रियेसाठी मार्गदर्शक तत्त्वे अंतर्भूत करणे यांसाठी सिंध सरकारने विधानसभेत नवीन कायदा करण्याचा प्रयत्न २ वेळा केला; परंतु दोन्ही वेळा सरकार कायदा संमत करू शकले नाही. वर्ष २०१६ मध्ये सिंध विधानसभेत हे विधेयक संमत करण्यात आले होते; परंतु तेथील धार्मिक पक्षांनी या विधेयकाला आक्षेप घेतला होता. धर्मांतरासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता. राज्यपालांनी या विधेयकावर स्वाक्षरी केल्यास विधानसभा कह्यात घेण्याची धमकी या धर्मांध गटांनी दिली होती. राज्यपालांनी स्वाक्षरी करण्याचे टाळले आणि त्यामुळे कायदा रेंगाळला. वर्ष २०१९ मध्ये सिंध सरकारने हे विधेयक काही सुधारणांसह विधानसभेत पुन्हा मांडले; परंतु या वेळीही तेथील धार्मिक पक्षांनी त्याला विरोध केला. या विधेयकाच्या निषेधार्थ तेथील राजकीय आणि धार्मिक नेते पिर मियान अब्दुल खलीक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन छेडण्यात आले. सिंधमध्ये अल्पवयीन हिंदु मुलींचे बलपूर्वक धर्मांतर करण्याच्या प्रकरणामध्ये पिर मियान अब्दुल खलीक यांचा सहभाग होता.
२. रिना आणि रविना या दोन बहिणींचे बलपूर्वक धर्मांतर
मार्च २०१९ मध्ये धर्मांधांनी रिना आणि रविना या दोन बहिणींचे बलपूर्वक धर्मांतर केले. त्यांचा बलपूर्वक निकाह केल्याचा दावा करून पाकिस्तानातील २ सहस्र हिंदूंनी त्यांना न्याय देण्याची मागणी करत आंदोलन केले. पाकिस्तानमध्ये हिंदु मुलींच्या बलपूर्वक धर्मांतर आणि निकाहाची अनेक प्रकरणे घडली आहेत. तेथील असुरक्षित हिंदु महिलांना धर्मांधांकडून लक्ष्य केले जाते. या महिलांना सत्ता आणि पैसा यांचा धाक दाखवून धर्मांतरित केले जाते आणि नंतर त्यांच्याशी बलपूर्वक निकाह लावून दिला जातो. हिंदु महिला आणि मुली यांचे बळजोरीने धर्मांतर केले जाते कि मन वळवून धर्मांतर केले जाते ? यांतील भेद निश्चित करून न्याय देण्याचा प्रयत्न न्यायालये करतात; परंतु हा निवाडा करतांना पाकिस्तानातील न्याययंत्रणा धर्मांधांच्या दबावाखाली येणार नाही कशावरून ? त्यामुळे अल्पसंख्यांक हिंदूंना तेथे न्याय मिळण्याची शक्यता अल्पच आहे.
३. पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन हिंदु मुलीच ठरताहेत धर्मांतराच्या बळी
पाकिस्तान जागतिक मानवाधिकार आयोगाचा सदस्य आहे. जागतिक मानवाधिकार आयोगाने प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. यामध्ये प्रत्येकाला धर्म पालटण्याचा अधिकारही दिलेला आहे; परंतु कुणावरही धर्म पालटण्यासाठी बळजोरी केली जाऊ नये, हेही निश्चित केले आहे. युरोपच्या मानवाधिकार न्यायालयाने धर्मांतराच्या सूत्रावर मतपरिवर्तनाद्वारे धर्मांतर आणि बळजोरीने धर्मांतर यांतील भेद निश्चित करणारी मार्गदर्शक तत्त्वे सिद्ध केली आहेत. असे असतांना पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे हनन केले जाते. पाकिस्तानमधील कायद्याविषयीची यंत्रणा अल्पसंख्यांकांवर भेदभाव करणारी आहे. अल्पसंख्यांक समुदायातील महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जातो. बळजोरीने धर्मांतर केलेल्या हिंदु महिलांना त्यांचे कुटुंबीय ‘काफीर’ असल्याचे सांगून त्यांची भेट घेण्यास परावृत्त केले जाते.
४. मुसलमानेतर महिलांच्या सुरक्षेविषयीची आंतरराष्ट्रीय बंधनांचे पाकिस्तानमध्ये उल्लंघन
पाकिस्तानातील बलाढ्य कट्टरवादी आणि गुन्हेगार गट यांकडून हिंदु महिला अन् मुली यांचे मोठ्या प्रमाणात शोषण केले जाते. मुसलमानेतर महिलांच्या सुरक्षेविषयीच्या आंतरराष्ट्रीय बंधनांचे पालन पाकिस्तानकडून केले जात नाही. पाकिस्तानमधील अल्पसंख्यांक कुटुंबांना मानसिक तणावाखाली वावरावे लागते. या कुटुंबांतील महिला आणि मुली यांनी घराबाहेर पडणे धोक्याचे ठरले आहे. हिंदूंचे धर्मांतर हा तेथील असहिष्णु मुसलमानांसाठी उत्सव असतो. ‘पाकिस्तानमध्ये हिंदु महिला सुरक्षित नाहीत’, हाच संदेश येथे द्यावासा वाटतो.
– सुलेमा जहांगिर (‘द डॉन’ (१२.४.२०२०)) (https://www.dawn.com/news/1548550)