रशिया-युक्रेनच्या युद्धातून भारताने बोध घेऊन शत्रूशी लढण्यासाठी सिद्धता करावी ! – संपादक
१. दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाची सर्वाधिक हानी युक्रेनवरील आक्रमणामुळे होणे
रशियाचे सैन्य हे जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे. त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सर्वकाही आहे; परंतु युक्रेनशी चालू असलेल्या युद्धातून त्यांना जे मिळवायचे होते, ते अद्यापही प्राप्त झालेले नाही. त्यांना युक्रेनच्या शहरांवर ताबा मिळवता आला नाही. युक्रनेची राजधानी कीव पडली नाही. युक्रेनच्या राष्ट्रपतींना हाकलून द्यायचे होते; पण तेही झाले नाही, म्हणजे हे युद्ध जवळपास ‘स्टेलमेट’ (कठीण परिस्थितीचे) झाले आहे. आपण हे युद्ध आपल्या दिवाणखान्यात बसून पाहू शकतो; पण ज्या चुका रशिया, नाटो (उत्तर अटलांटिक करार संघटना), युरोपीय राष्ट्रे आणि काही चुका युक्रेन करत आहे, त्यापासून भारताला पुष्कळ काही शिकण्यासारखे आहे.
(सौजन्य : Brig Hemant Mahajan,YSM)
रशियामध्ये १८ ते २७ वयोगटातील तरुणांना सैन्यात ३ वर्षे नोकरी करणे बंधनकारक असते. अनेकांना सैन्यात जायला आवडत नाही. अलीकडेच रशियाच्या वर्तमानपत्रात बातमी आली की, माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात असलेल्या तरुणांना सैन्यात जाण्याच्या बंधनातून मुभा देण्यात आलेली आहे. रशियाच्या तरुणांचे सैन्याच्या नोकरीत अजिबात लक्ष नसते. त्यामुळे हे सैनिक लढायला सिद्ध नसतात. असे म्हटले जाते की, या युद्धामध्ये अनेक ठिकाणी हे तरुण सैनिक युद्धात भाग न घेता रणगाडे सोडून पळून गेले. या स्थितीत रशियाला सैन्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रशियाला उपलब्ध सैन्याच्या साहाय्याने युक्रेनवर विजय मिळवणे सोपे राहिले नाही किंवा अतिशय कठीण आहे.
पुष्कळ वर्षे युद्ध न झाल्याने रशियाचे जनरल युद्धकला विसरलेले आहेत. त्यांनी त्यांच्या सैन्यात असलेल्या कमतरता त्यांच्या सरकारला सांगितल्या नाहीत. रशियाच्या सैन्याचे मनोबल आणि त्यांचे प्रशिक्षणही चांगले राहिलेले नाही. याविषयी पुतिन यांना वेळेत माहिती नसल्याने ते गर्जना करत राहिले; परंतु रशियाचे सैन्य आणि त्यांचे जनरल हे त्यावर कृती करू शकले नाहीत. या युद्धात रशियाचे ७ जनरल (अधिकारी), तसेच मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेले आहे. रशियाच्या मते त्यांचे १ सहस्र ६०० सैनिक मारले गेले, तर पाश्चात्त्य जगाच्या मते रशियाचे त्याहून १० पट अधिक सैनिक मारले गेले आहेत. एवढे मात्र खरे की, दुसऱ्या महायुद्धानंतर रशियाची सर्वाधिक हानी युक्रेनवरील आक्रमणामुळे झाली आहे.
२. रशियन लोकांची युरोपमधील संपत्ती कह्यात घेण्यात येत असल्याने त्यांचा या युद्धावर रोष असणे
रशियाच्या सैन्याच्या कुटुंबियांना या युद्धात फारसा रस नाही. त्यांना केवळ आर्थिक संपत्तीत रस आहे. रशियाचे श्रीमंत लोक युरोपच्या विविध भागांत स्थावर मालमत्ता विकत घेतात आणि त्यांचे कमावलेले पैसे तेथेच गुंतवतात. त्यांना रशिया सोडून बाहेर रहायचे असते. अशी सहस्रो कोटी रुपयांची गुंतवणूक रशियाच्या लोकांनी युरोपमध्ये केली आहे. रशियाचे लोक त्यांचा पैसा देशासाठी न वापरता तो देशाबाहेर गुंतवतात; कारण त्यांना युरोप आणि अमेरिका यांची लोकशाही अधिक भावते आहे. या युद्धामुळे आता या सगळ्यांची युरोपमधील संपत्ती कह्यात घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचाही या युद्धावर रोष आहे, तसेच रशियावर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे बाहेर रहात असलेल्या लोकांनाही त्रास होत आहे.
३. युक्रेनची मोठी हानी आणि विध्वंस होऊनही तो रशियाला शरण न येणे
रशिया-युक्रेनमध्ये चालू असलेले युद्ध हे पारंपरिक आहे. त्यात भूदल, नौदल आणि वायूदल या सर्वांचा वापर केला जात आहे. रशियाने प्रथम धक्कातंत्राचा वापर करून युक्रेनच्या सैनिकांना शरण येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला; पण तसे झाले नाही. नंतर त्यांनी युक्रेनच्या अनेक शहरांना वेढा घातला आणि त्यांची वीज, पाणी, रेशन बंद करून त्यांना शरणागती पत्कारायला भाग पाडण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही त्यांना यश आले नाही. या युद्धात युक्रेनच्या सैन्याची अल्प हानी होत असून रशियाच्या लोकांची अधिक हानी होत आहे. शाळा, महाविद्यालये आणि मोठ्या इमारती उद्ध्वस्त केल्या जात आहेत. असे असूनही युक्रेनचे लोक शरणागती पत्करतील, याची शक्यता फारच अल्प वाटत आहे. एवढा मोठा विध्वंस होऊनही रशिया युक्रेनला शरणागती पत्करायला भाग पाडू शकला नाही.
४. रशियाच्या नौदलाने युद्धात विशेष कामगिरी न केल्याने युद्ध अधिक काळ लांबणे
आता रशिया म्हणत आहे की, ते त्यांचे ‘स्केल ऑफ ऑपरेशन’ (युद्धाची कारवाई) अल्प करणार आहे. रशियाला भूदलाच्या साहाय्याने युक्रनेच्या शहरांच्या आत जाऊन ते पादाक्रांत करावे लागेल. युक्रेनचे सैन्य विविध शहरांमध्ये राहून लढत आहे. ती शहरे जिंकण्यासाठी रशियाला त्यांच्या ६ पट सैन्याची आवश्यकता लागेल. रशियाचे प्रचंड मोठे नौदल आहे; पण त्यांनी फारसे काही केले नाही. युक्रेनला दोन समुद्रे आहेत. तेथून युक्रेनची सर्व वाहतूक होते. रशियाच्या सैन्याला तेथील शहरे आणि बंदरे बंद पाडता आली असती, तर हे युद्ध लवकर थांबवता आले असते; पण नौदलाने शहरांवर केवळ तोफांद्वारे आक्रमण करण्याविना दुसरे काही केलेले नाही. त्यामुळे रशियाच्या नौदलाचे यश फारच संकुचित आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे