पाकिस्तानच्या अर्धसैनिक दलाच्या तळावरील आक्रमणात २२ जण घायाळ

आक्रमण करणारे तीनही आतंकवादी ठार

पाकने अनेक दशके आतंकवाद पोसला. त्यामुळे ‘त्याने जे पेरले, तेच आता उगवले आहे’, हे लक्षात घ्या ! – संपादक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील टांक जिल्ह्यात असलेल्या अर्धसैनिक दलाच्या तळावर आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात २२ जण घायाळ झाले. या वेळी आक्रमण करणाऱ्या तिघाही आतंकवाद्यांना ठार करण्यात आले. या आक्रमणामागे ‘तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ (टीटीपी) या आतंकवादी संघटनेचा हात असल्याचे म्हटले जात आहे.

१. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आतंकवादी गेल्या काही दिवसांपासून तळाच्या जवळ लपून बसले होते. आतंकवाद्यांकडून अमेरिकी बनवावटीची शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

२. टीटीपीच्या अनेक आतंकवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळतो. तेथूनच ते पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण करण्याचा कट रचत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. या आक्रमणामुळे तालिबान आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत चालल्याचे समोर येत आहे.