नवाब मलिक यांची पाठराखण केल्यामुळे भाषण अर्ध्यावर सोडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांचा सभात्याग !

विधानसभा

मुंबई, २६ मार्च (वार्ता.) – विधानसभेच्या सभागृहात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर न दिल्याने भाजपच्या आमदारांनी २५ मार्च या दिवशी सभात्याग केला. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांची पाठराखण केल्यामुळे भाषण अर्ध्यावर सोडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजप नेते विधानभवनातून बाहेर पडले.

शेतकरी सूरज जाधव यांची आत्महत्या, शेतकर्‍यांच्या वीजदेयकांचा प्रश्न, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार, मंत्री नवाब मलिक यांनी त्यागपत्र न देणे, अशा सर्व गोष्टींवर महाविकास आघाडी सरकारने कोणतेही उत्तर दिले नाही. शेतकरी, कामगार आणि सामान्य यांच्यासाठी कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. मुख्यमंत्र्यांनीही नवाब मलिक यांचे समर्थन केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात संतप्त झाले आणि त्यानंतर त्यांनी सभात्याग केला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी शाळा बंद झाल्या, हे मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितले नाही. कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू झाले, यावर ते बोलले नाहीत. नवाब मलिकांचे समर्थन उद्धव ठाकरे करत असल्याने याचे दुःख आहे. मलिकांनी बाँबस्फोटाच्या आरोपींसमवेत खोट्या कागदपत्रांच्या आधारावर  व्यवहार केला होता. तरीही मलिकांचे त्यागपत्र घेतले जात नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ‘टोमणे बाँब’ हे सर्वांत मोठे शस्त्र आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.