पुतिन हे युद्ध गुन्हेगार ! – अमेरिका

दुसर्‍या विश्‍वयुद्धानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या अगदी जवळ भेट देण्याची पहिलीच वेळ !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व रशियाचे राष्ट्राध्यक्ष  व्लादिमिर पुतिन

वॉर्सा (पोलंड) – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना उघड आव्हान देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे युक्रेनच्या सीमेपासून अवघ्या ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीश शहर ‘राइझॉव’ येथे पोचले. बायडेन यांनी तेथे तैनात असलेल्या ‘नाटो’ सैनिकांची भेट घेतली. या वेळी बायडेन यांनी पुतिन यांना ‘युद्ध गुन्हेगार’ असे संबोधले. ते म्हणाले, ‘‘मित्रपक्षांना दीर्घकाळ संघटित ठेवणे, हा विनाश न्यून करण्याचा एकमेव मार्ग आहे. पुतिन यांच्या आक्रमकतेने युरोपमध्ये कहर केला आहे. रशियाने युक्रेन जिंकण्याच्या महत्त्वाकांक्षेवविषयी पुनर्विचार केला पाहिजे.’’

दुसर्‍या महायुद्धानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धग्रस्त देशाच्या सीमेच्या इतक्या जवळ भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन यांनी सांगितले की, बायडेन पोलंडचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेज डुडा, तसेच युक्रेनी शरणार्थी यांनाही भेटणार आहेत.

युक्रेनला जाऊ शकत नाही, याची बायडेन यांना खंत !

‘सुरक्षेच्या कारणास्तव मी युक्रेनला जाऊ शकलो नाही, याचे मला वाईट वाटते’, असेही बायडेन या वेळी म्हणाले.