धन, संपत्ती आणि पद या तात्कालिक सुख देणार्‍या गोष्टींपेक्षा भगवंताकडे शाश्वत सुख आणि समाधान मागावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी (बसलेले) यांना ‘सनातन पंचांग २०२२’ भेट देतांना वैद्य संजय गांधी (डावीकडून दुसरे), श्री. वसंत चव्हाण (डावीकडे), राजू भोपळे (उजवीकडे महाराजांच्या शेजारी), श्री. प्रसाद कुलकर्णी (उजवीकडे)

वालूर (तालुका-शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर), १८ मार्च (वार्ता.) – भगवंताची उपासना करतांना ती श्रद्धा, विश्वास ठेवून नि:संशय करावी. भगवंत प्रत्येक मनुष्य-प्राणिमात्र यांच्यामध्ये भरभरून आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये जी दुःखे किंवा संकटे येतात ती त्याच्या कर्मामुळेच आलेली असतात. हे समजून घेऊन चिंताविरहित जीवन व्यतीत करावे. धन, संपत्ती आणि पद या तात्कालिक सुख देणार्‍या गोष्टींपेक्षा भगवंताकडे शाश्वत सुख अन् समाधान मागावे, असे मार्गदर्शन कणेरी मठ येथील प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. वालूर येथील वार्षिक सत्संग सोहळ्यात ते बोलत होते.

हिंदूंनी त्यांचे सण त्यामागील धर्मशास्त्र समजून घेऊन साजरे करावेत ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी, प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी आणि उपस्थित भक्तगण

या प्रसंगी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी म्हणाले, ‘‘जन्महिंदूंनी कर्महिंदु बनण्यासाठी त्यांच्या धनातील २० टक्के धन हे धर्मकार्यासाठी धर्मिक संस्था, तसेच संत यांच्या चरणी अर्पण करणे आवश्यक आहे. हिंदूंनी होळी, रंगपंचमी, गुढीपाडवा, असे सण साजरे करतांना त्यामागील धर्मशास्त्र समजून घेऊन साजरे केल्यास त्यातील आनंद त्यांना घेता येईल.’’
या सोहळ्याचा लाभ ७०० भाविकांनी घेतला. हा सत्संग सोहळा व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्वश्री प्रशांत मिरजकर, मिलिंद सबनीस, शिवाजी पाटील यांनी विशेष परीश्रम घेतले.

सत्संगासाठी उपस्थित भाविकगण

क्षणचित्रे

१. या सत्संग सोहळ्याचे सूत्रसंचालन स्वामीजींचे भक्त श्री. शिवाजी पाटील यांनी केले.
२. व्यासपिठावर कु. मयंक मिलिंद सबनीस या १० वर्षांच्या बालकाने ‘श्री गणपति अथर्वशीर्ष’ स्तोत्र म्हणून दाखवले.

सत्संग सोहळ्याच्या प्रसंगी सनातन संस्थेचे वैद्य संजय गांधी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष श्री. राजू भोपळे यांनी प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांना ‘सनातन दिनदर्शिका २०२२’ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक भेट दिला.