विद्यार्थ्यांना नैतिक बनवणारे धर्मशिक्षण दिल्यास असे प्रकार रोखता येतील ! – संपादक
मुंबई, १७ मार्च (वार्ता.) – शालांत परीक्षेत ‘कॉपी’चे प्रकार आढळल्यास त्या शाळेत भविष्यात १० वीच्या परीक्षा घेण्यात येणार नाहीत, तसेच शाळेची मान्यता रहित करण्यात येईल, अशी चेतावणी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी १६ मार्च या दिवशी विधान परिषदेत दिली. इयत्ता १० वीच्या परीक्षेत संभाजीनगर येथे झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणाविषयी सभागृहात माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत त्यांनी माहिती दिली.
पेपरपुटीचे प्रकार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी सभागृहात सांगतांना वर्षा गायकवाड म्हणाल्या,‘‘विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात १ घंटा आधी पोचावे. सकाळी १०.३० वाजताचा पेपर असल्यास सकाळी ९.३० वाजता, तर दुपारी ३ वाजता पेपर असल्यास दुपारी २ वाजता परीक्षा केंद्रावर पोचायला हवे. पडताळणी केल्याविना विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात प्रवेश करता येणार नाही. जिल्हाधिकारी किंवा आयुक्त यांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जाण्याची सूचना देण्यात आली आहे.’’