‘द कश्मीर फाइल्स’ या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने….
१. काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षतावादी यांनी चित्रपटाला विरोध करण्यामागचे कारण
विवेक अग्निहोत्री यांनी ‘द कश्मीर फाइल्स’ हा हिंदी भाषेतील चित्रपट दिग्दर्शित करून प्रकाशित केला. त्यावर मोठे वादळ उठले. ‘हिंदू आणि मुसलमान समाजात तेढ निर्माण करणारा हा चित्रपट’ असल्याचे मत काँग्रेस आणि धर्मनिरपेक्षतावादी यांच्या वतीने हिरीरीने मांडण्यात येत आहे. राष्ट्रहिताच्या दृष्टीने विचार न करण्याची सवय जडल्यामुळे ‘हिंदूंवर झालेला अन्याय जगासमोर आणण्यात राष्ट्राचे अहित आहे’, असे समीकरण होऊन बसले. आतंकवाद्यांना पाठीशी घालणे, हा न्याय आहे. ‘हिंदूंवर सातत्याने अन्याय करत रहाणे, हा अल्पसंख्यांक समाजाचा पर्यायाने आतंकवाद्यांचा घटनात्मक अधिकार आहे’, असा सोयीस्कर अर्थ लावला जातो. त्यामुळे काश्मीरमधून विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांची वेदना, त्यांच्यावर झालेला अत्याचार, त्यांची निर्घृणपणे करण्यात आलेली हत्या, हे अमानवीय कृत्य तीन दशके दाबून टाकण्यात आले. याचेच अतीव दुःख अनेकांना आहे. त्यांचे हे दुःख विस्थापित आणि निराधार झालेल्या काश्मिरी पंडितांच्या यातनांपेक्षा, दुःखापेक्षा अधिक आहे. म्हणूनच ही मंडळी या चित्रपटाला विरोध करत आहेत.
२. ‘गजवा ए हिंद’चे स्वप्न धुळीस मिळण्याची वेळ येत असल्याने चित्रपटाला विरोध करणे
‘दार उल् हरब’चे (युद्धभूमी. जेथे इस्लामचे शासन चालत नाही, असा प्रदेश) रूपांतर ‘दार उल् इस्लाम’मध्ये (जेथे इस्लामचे शासन चालते, असा प्रदेश.) करण्यासाठी जिहाद करणे’, ही शिकवण ज्यांच्या रोमारोमांत भिनली आहे, अशा आतंकवाद्यांच्या कारवायांना चाप बसणार आहे. त्यामुळे त्यांचे ‘गजवा ए हिंद’चे स्वप्न धुळीस मिळण्याची वेळ येण्याची शक्यता आतंकवाद्यांना वाटते. म्हणूनच या चित्रपट प्रदर्शनाला विरोध केला जात असावा.
३. मानवाधिकारवाल्यांचा हिंदूंविषयी असलेला दुटप्पीपणा
मानवाधिकाराचा डंका पिटणार्या लोकांच्या दृष्टीने हिंदु मानव नाहीत, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हिंदूंनी संयमानेच वागले पाहिजे. त्यांच्यावर कितीही अन्याय, अत्याचार झाला, तरी त्यांनी त्या विरोधात आवाज उठवू नये. त्यांनी आवाज उठवला, तर त्यांना तात्काळ असहिष्णू ठरवण्याचा अधिकार मानवाधिकारवाल्यांना आहे. काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या मानवी हत्यांमुळे त्यांच्या डोळ्यात आसवे (अश्रू) दाटून येत नाहीत; पण काश्मिरी पंडितांच्या वेदनांना वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न केला, तर मात्र त्यांच्या डोळ्यातून अंगार बाहेर पडतो. याचा अनुभव हिंदूंनी वारंवार घेतला आहे.
४. देशात अल्पसंख्यांकांना मिळत असलेला एक न्याय आणि हिंदूंना देण्यात येत असलेली अन्यायी वागणूक
अल्पसंख्यांकांना रस्त्यात कुठेही नमाज पढण्याची आणि रहदारीला अडथळा निर्माण करण्याची पूर्ण मुभा आहे; कारण तो त्यांचा घटनात्मक अधिकार आहे; पण हिंदूंना कोणतीही मिरवणूक मशिदी समोरील रस्त्यावरून नेण्याचा अधिकार नाही. अल्पसंख्यांकांकडून हिंदूंना उपद्रव झाला, तर ते न्याय्य आणि लोकशाहीला धरून असते. धर्मांधांच्या राष्ट्रघातकी आणि समाजविघातक वर्तनाच्या विरुद्ध हिंदूंनी आवाज उठवला, तर देशातील लोकशाही, देशाची राज्यघटना, राष्ट्राचे ऐक्य सारेच धोक्यात येते.
५. हिंदु जागा होत असल्याने इतिहासाची पाने बाटवण्याच्या अपप्रकाराला चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे खीळ बसणार असणे
आता या सर्व गोष्टींना न जुमानता हिंदू स्वतःच्या वेदना व्यक्त करू शकतो. या राष्ट्राचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर होऊ नये; म्हणून तो जागा झाला आहे. हीच गोष्ट हिंदुस्थानचे तुकडे करू पहाणार्यांना सहन होत नाही. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटावरून जो कांगावा चालू झाला आहे, त्यावरून आपल्याला असे निश्चित म्हणता येईल. इस्लामी क्रूरकर्म्यांना दयाळू, मानवतेचे उपासक, सत्शील शासनकर्ता म्हणून त्यांचा गुणगौरव ऐतिहासिक ग्रंथातून मूळ इतिहासाला गाळून सांगण्याचा प्रयत्न चालू आहे. अशा प्रकारे इतिहासाची पाने बाटवण्याच्या कार्याला ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे खीळ बसणार आहे. म्हणूनच या चित्रपटाच्या विरोधात आरडाओरड चालू आहे. असे अनुमान काढण्यास पुरेपुर वाव आहे.