बिटकॉईन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या सायबर तज्ञांचे घर आणि कार्यालय यांची झडती !

पुणे – बिटकॉईन (अभासी चलन) फसवणुकीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या अन्वेषणासाठी तांत्रिक तज्ञ म्हणून साहाय्य करण्याच्या निमित्ताने पुढे आलेल्या सायबर तज्ञ पंकज घोडे आणि रवींद्रनाथ पाटील यांनीच पोलिसांनी बिटकॉईनविषयी दिलेल्या माहितीचा अयोग्य वापर करून कोट्यवधी रुपयांच्या बिटकॉईनचा अपहार केला. या प्रकरणी पोलिसांनी १२ मार्च या दिवशी दोघांना अटक केली असून त्यांना १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दोघांची कार्यालये आणि घरे यांची झडती घेत पोलिसांनी महत्त्वपूर्ण कागदपत्रे जप्त केली आहेत. या माहितीच्या आधारे अपव्यवहाराची व्याप्ती पुढे येऊ शकणार आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्यात प्रविष्ट गुन्ह्यातील आरोपींद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे घोडे, पाटील यांनी आरोपीच्या बिटकॉईन वॉलेटवरील बिटकॉईन आणि विविध प्रकारची क्रिप्टोकरन्सी ही विविध वॉलेटवर वर्ग केल्याचे उघड झाले असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे. संबंधित वॉलेटवर बिटकॉईन आणि क्रिप्टोकरन्सी वर्ग करण्यात आली आहे. त्या वॉलेटची माहिती दोघांकडून पोलीस घेत आहेत. दोघांनी बिटकॉईन, बिटकॉईन कॅश, इथर अशा विविध स्वरूपातील क्रिप्टोकरन्सीचा अपहार विविध वॉलेटवर केला आहे, त्यासाठी त्यांनी ठराविक ‘पासवर्ड’चा वापर केला असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत.