मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – नागपूर वगळता राज्यातील सर्व माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला हप्ता दिलेला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये फरकाचा पहिला हप्ता पूर्णपणे दिला आहे, तर उर्वरित २३ जिल्ह्यांमध्ये अंशत: रक्कम वाटण्यात आली आहे. आम्ही राज्याकडे १ सहस्र ६६३ कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यातील ९११ कोटी रुपये मिळाले असून ते वरीलप्रमाणे वितरीत केले आहेत, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ११ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात दिली. आमदार सुनील राणे आणि विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी त्या बोलत होत्या.
मंत्री वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या की, राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची संख्या १ लाख ७२ सहस्र १९७ असून फरकाचा पहिला हप्ता १ लाख ३९ सहस्र ६६ लाभार्थ्यांना दिला आहे, तसेच ३३ सहस्र १३१ जणांना पहिला हप्ता दिलेला नाही. चालू वर्षीय अंदाजपत्रकामध्ये आम्ही त्यासाठी २ सहस्र कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यातून पहिल्या हप्त्यातील राहिलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांना लवकरच ही फरकाची रक्कम देता येईल. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या २ वर्षांमध्ये ८ सहस्र ७७६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या सर्वांना फरकाचा पहिला आणि दुसरा हप्ता दिलेला आहे.